संख परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा
By Admin | Updated: February 12, 2015 00:30 IST2015-02-11T23:32:40+5:302015-02-12T00:30:29+5:30
फिडर बदलाची कामे ठप्प : पाणी पुरवठा विस्कळीत

संख परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा
संख : फिडर बदलाची रेंगाळलेली कामे, जुन्या झालेल्या विद्युत वाहिन्या, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जादा भारनियमन यामुळे संख (ता. जत) विद्युत विभाग केंद्रातून अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिके, द्राक्षे, डाळिंब, फळबागांवर व गावातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. विहिरीत पाणी असूनही अनियमित वीज पुरवठ्यामुळे ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.पूर्व भागातील संख येथील ३३ के.व्ही. विद्युत विभागांतर्गत ७२ गावांचा समावेश आहे. संखअंतर्गत माडग्याळ, उमदी, बोर्गी, तिकोंडी, दरीकोणूर, सोन्याळ, संख ही ७ उपकेंद्रे आहेत. अनेक गावांतील विद्युत वाहिन्या, तसेच सिमेंटचे, लोखंडी विद्युत खांब ४५ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्याकडे काहीही लक्ष दिलेले नाही. विद्युत वाहिन्यांच्या ताराही बदललेल्या नाहीत. जास्त वर्षे झाल्याने या तारांची क्षमता कमी झाली आहे. थोड्याशा वादळी वाऱ्यानेही तुटून पडत आहेत. विजेच्या खांबाजवळ झाडेही वाढली आहेत.
विद्युत विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे गट करून कृषिपंपासाठी कनेक्शन दिले आहेत. शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिकांची खुदाई करून जागोजागी विद्युत कनेक्शन घेतली आहेत. सध्या माळरानावर हजारो मीटरवरून जलवाहिनी करून पाणी उचलण्यात आले आहे. माळरानावर द्राक्ष, बोर, डाळिंब, आंबा या फळबागा उभारल्या आहेत. विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
वाड्या-वस्तीवर घरगुती पिठाच्या गिरण्या, मिरची कांडप यंत्र, घरगुती कनेक्शनचा विजेचा वापर वाढला आहे. परिणामी विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर ताण पडत आहे. कनेक्शन, विजेची मागणी वाढून सुद्धा विद्युत विभागाने समांतर विद्युत वाहिन्या तयार केल्या नाहीत. आहे त्याच जुन्या वाहिन्यांवर वीज पुरवठ्याचा गाडा पुढे हाकला जात आहे.
गावोगावच्या गु्रप टी.सी.वर क्षमतेपेक्षा जादा कृषी कनेक्शन्स झाली आहेत. विद्युत विभागाच्या आशीर्वादाने हुक टाकून कृषी विद्युत मोटारीही चालविल्या जात आहेत. त्याचा अतिरिक्त ताण टी.सी.वर पडत आहे. त्यामुळे टी.सी. जळू लागल्या आहेत. टी.सी. जळल्यानंतर नवीन बसविण्यासाठी शेतकऱ्यांना जादा पैसे भरून, स्वत: कवठेमहांकाळवरून टी.सी. आणावा लागतो. यामध्ये ८-१० दिवसांचा कालावधी जातो.
विजेच्या मागणीप्रमाणे वीज पुरवठा क्षमतेने केला जात नाही. कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. विद्युत वाहिन्यांवर अतिरिक्त लोड पडून तारा आपोआप तुटून पडत आहेत. दरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, लमाणतांडा या गावांतील कृषिपंपांना विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या तारा वारंवार तुटत आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. विजेचा जास्त लोड लक्षात घेऊन सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी फिडर बसविण्याची गरज आहे. तशी प्रत्येक उपकेंद्रातील गावांना नवीन विद्युतलाईन टाकून फिडर बसविण्याला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फिडर बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. सुरळीतपणे वीज पुरवठा होण्यासाठी नवीन फिडर लवकरात लवकर बसविण्याची गरज आहे.
विद्युत खांब, तारा, डी. पी. या ४० वर्षांपूर्वी बसविण्यात आल्या आहेत. खांब जुने झाल्याने वाऱ्याने मोडून पडतात. ताराही तुटतात. ही समस्या सोडविण्यासाठंी नवीन खांब, तारा बसविण्याची आवश्यकता आहे. तसेच भारनियमनाचे वेळापत्रक असताना सुद्धा जादा वेळ भारनियमन दिले जात आहे. संपर्क साधला असता, वरूनच वीज पुरवठा बंद आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. योग्य नियोजन करून भारनियमन कमी करणे शक्य आहे. (वार्ताहर)
जादा बिलाची आकारणी
दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच, विद्युत कंपनीचे कर्मचारी विहिरीवर न जाताच, मीटर रीडिंग न पाहताच चुकीची रीडिंग देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीवरील मीटर न फिरताही जादा बिले आली आहेत. कमीत कमी बिलापेक्षा ही बिले दुपटीने आली आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीने लक्ष देऊन वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.