दुरंदेवाडीतील खोतांच्या घरी ७० वर्षांनंतर उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:09+5:302021-05-31T04:20:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बिळाशी : बिळाशी दुरंदेवाडी, ता. शिराळा येथील राॅकेलच्या दिव्यावर अभ्यास करणाऱ्या मुलांच्या घरी ग्रामीण कथाकार, साहित्यिक ...

Light after 70 years at Khotan's house in Durandewadi | दुरंदेवाडीतील खोतांच्या घरी ७० वर्षांनंतर उजेड

दुरंदेवाडीतील खोतांच्या घरी ७० वर्षांनंतर उजेड

लोकमत न्यूज नेटवर्क

बिळाशी : बिळाशी दुरंदेवाडी, ता. शिराळा येथील राॅकेलच्या दिव्यावर अभ्यास करणाऱ्या मुलांच्या घरी ग्रामीण कथाकार, साहित्यिक बाबासाहेब परीट यांनी वडील अण्णा परीट यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने वीज जोडणी करून दिली. यामुळे सुनंदा खोत यांच्या घरी ७० वर्षांनंतर उजेड आला. मुले राॅकेलच्या दिव्यावर व डांबाखालील उजेडात अभ्यास करीत होती. अचानक घरी वीजजोडणी केल्यामुळे मुलांच्या व घरातील सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सुनंदा खोत या रोजंदारी करून पोट भरतात. त्यांच्या घरी अद्यापही लाइट नव्हती. एक मुलगी दहावीत, तर दुसरी नववीत व मुलगा सातवीत आहे. परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने आणि कागदपत्रांची जंत्री होत नसल्याने त्यांना वीज घेणे जमलेच नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल अण्णा परीट यांनी घेतली. त्या मुलांच्या घरी वीज जोडण्यासाठी मुलगा ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांना सूचना केली. याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करून अनामत रक्कम भरून फिटिंगचा सर्व खर्च परीट यांनी केला. अखेर काल सायंकाळी पाच वाजता सत्तर वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्या घरी वीज आली. दिव्यावर अभ्यास करणाऱ्या त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

दहावीत शिकणारी धनश्री खोत म्हणाली, खूप अभ्यास करून मला काही तरी बनायचं आहे. माझ्या जन्मानंतर पहिल्यांदा घरात वीज आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. रॉकेल मिळत नव्हतं गोडेतेलाच्या दिव्यावर मी अभ्यास करीत होते. आज आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे.

ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट म्हणाले, दरवर्षी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून मदत करतोच; पण वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिकणाऱ्या मुलांसाठी वीज देण्याची वडिलांची इच्छा आनंद देणारी आहे. मुलांच्या भविष्यासाठी वडिलांच्या वाढदिवसाची भेट म्हणून केलेली वीज जोडणीची भेट खूप महत्त्वाची आहे.

सुनंदा खोत या मुलांना शिकविण्यासाठी आग्रही आहेत. त्या म्हणाल्या, आमचा उभा जन्म अंधारात गेला; पण आज लाइट आल्याचं समाधान आहे.

चौकट

अनेकांच्या मदतीचा हात

वीज जोडणी लवकर व्हावी यासाठी वीज वितरण कंपनीचे वायरमन योगेश पाटील, अभिषेक शेणवी व विकास यादव (कोकरूड), बी. डी. रोकडे यांनी तातडीने फिटिंग करून दिले. बिळाशीचे उपसरपंच दत्तात्रय मगदूम यांनी तातडीने टेस्ट रिपोर्ट दिला, कुसाईवाडी ग्रामसेवक सचिन पाटील यांनी सहकार्य केले.

Web Title: Light after 70 years at Khotan's house in Durandewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.