आष्टेकरांच्या मदतीमुळे दीड वर्षाच्या बालकास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:38+5:302021-06-10T04:18:38+5:30
आष्टा : आष्टा येथील एका दीड वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागण झाली. त्याची प्रकृती खालावल्याने आष्टा पालिकेचे अधिकारी सचिन मोरे ...

आष्टेकरांच्या मदतीमुळे दीड वर्षाच्या बालकास जीवदान
आष्टा : आष्टा येथील एका दीड वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागण झाली. त्याची प्रकृती खालावल्याने आष्टा पालिकेचे अधिकारी सचिन मोरे यांनी आवाहन करताच या बालकांच्या मदतीला आष्टेकर हात धावले आणि एका रात्रीत ५० हजार रुपये जमा झाले. कोरोना संकटातही माणुसकीचे अनाेखे दर्शन यानिमित्ताने घडले.
संबंधित बालकाचे कुटुंब वडगाव अंबपवाडी येथील आहे. वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. कामानिमित्त आष्टा येथील चव्हाणवाडी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १० दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. ते त्यांना आष्टा येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रात दाखल होते. २ ते ३ दिवसांपूर्वी त्यांची पत्नी व दीड वर्षाच्या मुलाचा काेराेना अहवालही पॉझिटिव्ह आला. बालकाची तब्येत बिघडल्याने त्याला कुठे घेऊन जायचे हा प्रश्न कुटुंबासमोर होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने पालकांनी त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले नाहीत. त्यामुळे बालकास घेऊन ते घरी परतले.
संबंधित बालकाचा ऑक्सिजन ७५च्या दरम्यान होता. याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी सचिन मोरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने संबंधित मुलाच्या पालकांची भेट घेतली. लागेल ती मदत करण्याची ग्वाही देत बालकास खासगी रुग्णालयात दाखलही केले. डॉक्टरांना उपचार सुरू करण्यास सांगितले. तसेच तातडीने पालिका कर्मचाऱ्यांसह शहरातील मान्यवरांना संबंधित बालकाबाबत माहिती देऊन आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टेकरांनी एका रात्रीत ५० हजार रुपये जमविले.
सदिच्छा हॉस्पिटलचे डॉ. सचिन पाटील यांनी या बालकास दाखल करून घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले. डॉ. पाटील यांनीही माणुसकी जपत बालकाच्या विविध चाचण्यांची रक्कम घेतली नाही. सध्या या बालकावर उपचार सुरू असून सकारात्मक परिणाम दिसत आहेत. सध्या त्याचा ऑक्सिजन ९६च्या दरम्यान आहे.