जखमी नागाला शिराळकरांनी दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:59 IST2018-08-28T23:59:09+5:302018-08-28T23:59:13+5:30

जखमी नागाला शिराळकरांनी दिले जीवदान
विकास शहा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळकर आणि नाग हे नाते वेगळेच आहे. याची प्रचिती अनेकवेळा आली आहे. नागाबाबत फक्त नागपंचमीपुरते प्रेम नसून ते कायम आहे, हे अनेक घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाचे प्राण येथील युवकांनी वाचवले आणि आत्मियता दाखवून दिली.
सागाव (ता. शिराळा) येथे रस्त्याकडेला मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेला नाग निपचित पडला होता. हा नाग मेला असावा, असे नागरिकांना वाटले. मात्र या मार्गावरून जाणाऱ्या शिराळा येथील बंटी नांगरे, विक्रांत पवार, शिवकुमार आवटे, मनोज खबाले यांनी गाडीवरून उतरून पाहिले असता, त्याची थोडी हालचाल दिसली.
या चौघांनी लगेचच जखमी नागास शिराळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्याच्या डोळ्यावर तसेच शरीरावर दहा ते बारा ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गावडे, सुशांत शेणेकर, मोहन चव्हाण यांनी उपचार केले. यावेळी चौघांनीही नागास व्यवस्थित पकडल्याने त्याच्यावर व्यवस्थित उपचार करता आले.
शिराळा येथील नागरिकांनी याअगोदरही अनेकवेळा शेतात नांगरताना, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या, तसेच कूपनलिकेमध्ये अडकलेल्या नागाचे प्राण वाचवले आहेत.
शिराळा येथे साप दिसला की त्यास पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले जाते. साप जखमी अवस्थेत असेल, तर त्याच्यावर उपचार करून पूर्ण बरा झाल्यावरच त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले जाते.
सुरक्षित जागी सोडणार
वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, सचिन पाटील यांना कल्पना दिल्यावर ते तातडीने दवाखान्यात आले. उपचार झाल्यावर या जखमी नागास त्यांनी ताब्यात घेतले. आणखी काही दिवस उपचार करावे लागणार आहेत. त्यामुळे त्यास सुरक्षित पेटीत ठेवले असून, त्याची योग्य काळजी घेतली जात आहे. तो पूर्ण बरा झाल्यावर त्यास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे.