अंध कलाकारांच्या जीवनात ‘सप्तरंग’

By Admin | Updated: September 8, 2015 23:17 IST2015-09-08T23:17:04+5:302015-09-08T23:17:04+5:30

शैक्षणिक खर्चासाठी आॅर्केस्ट्रा : मिरजेतील अंध विद्यार्थ्यांची अपंगत्वावर मात

In the life of blind artists, | अंध कलाकारांच्या जीवनात ‘सप्तरंग’

अंध कलाकारांच्या जीवनात ‘सप्तरंग’

सदानंद औंधे-- मिरज मिरजेत महाविद्यालयीन शिक्षण व वसतिगृहाच्या खर्चासाठी अंध विद्यार्थ्यांनी सप्तरंग आॅर्केस्ट्राची निर्मिती केली आहे. आयुष्यात कायमचा अंधार असताना, सुरेल आवाजात हिंदी व मराठी गीते गाणाऱ्या गरीब अंध विद्यार्थ्यांचा हा आर्केस्ट्रा, सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे.  मिरजेतील अंध विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून शैक्षणिक खर्च मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या अंध विद्यार्थ्यांची अंधत्वावर मात करीत उच्च शिक्षण घेण्याची धडपड सुरू आहे. अंधांना दहावीपर्यंत ब्रेल लिपीत शिक्षणाची सोय सांगली, मिरजेत आहे. उच्च शिक्षणाची सोय पुणे येथे असल्याने व घरच्या गरीब परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडून घराच्या चार भिंतीत जीवन कंठावे लागते. या बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या दावल शेख या अंध विद्यार्थ्याने परिस्थितीवर मात करीत अंध विद्यार्थ्यांनीही उच्च शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. वसतिगृहातील १५ अंध विद्यार्थी मिरजेतील विविध महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. वसतिगृह चालविणे खर्चिक आहे. खर्चाच्या तुलनेत इतरांकडून मिळणारी मदत अपुरी असल्याने वसतिगृह व शिक्षणाला स्वकष्टाचा हातभार लावण्यासाठी वसतिगृहातील अंध विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.
विद्यार्थ्यांसाठी शहरातील समतानगर येथे वसतिगृह सुरू केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी अंध पुढे येत आहेत. गायन, वादन हे कलागुण सादर करुन निधी जमविण्याची कल्पना संस्थेचे अध्यक्ष दावल शेख यांनी मांडली. या कल्पनेतून त्यांनी अंध विद्यार्थ्यांचा ‘सप्तरंग’ या नावाने आॅर्केस्ट्रा साकारला आहे. या आर्केस्ट्रामध्ये मुला व मुलींसह १५ अंध कलाकार आहेत. हे अंध कलाकार नवीन, जुनी हिंदी, मराठी गाणी, भावगीते, कव्वाली यासारख्या गाण्यांचे सादरीकरण करतात. आतापर्यंत या अंध विद्यार्थ्यांनी पुणे, लातूर, सांगली, मिरजेत दहापेक्षा जास्त कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली आहे. तीन तासांचा अंधांचा आॅर्केस्ट्रा हा सध्या नावीन्याचा विषय ठरला आहे. कोणत्याही प्रशिक्षकाशिवाय अंध विद्यार्थ्यांनी डोळस कलाकाराप्रमाणे आॅर्केस्ट्रा तयार केला आहे.

कलेचा पैसा शिक्षणावर खर्च...
ग्रामीण भागातील अंधांसाठी स्थानिक पातळीवर वसतिगृहाची सोय झाल्यास अंध मुले मिरजेत महाविद्यालयात शिक्षण घेतील, या हेतूने त्यांनी सर्वधर्मसमभाव अंध-अपंग सेवाभावी संस्थेची स्थापना करुन, या संस्थेतर्फे अंध विद्यार्थ्यांसाठी शहरातील समतानगर येथे वसतिगृह सुरू केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी अंध पुढे येत आहेत. समाजाकडून मदत मिळत असली तरी, वसतिगृहात अंध विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने खर्चही वाढत आहे. ‘सप्तरंग’च्या माध्यमातून मिळणारी रक्कम अंधांच्या शिक्षणावरच खर्च केली जाते. सण, उत्सवासाठी प्रतिसाद मिळाल्यास अंधांच्या शिक्षणाला मदत होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दावल शेख यांनी सांगितले.

Web Title: In the life of blind artists,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.