जिल्ह्यातील पन्नासवर कृषी केंद्रांचे परवाने रद्द
By Admin | Updated: May 20, 2016 00:08 IST2016-05-19T22:52:26+5:302016-05-20T00:08:07+5:30
कृषी विभागाची कारवाई : विक्री बंदचे आदेश

जिल्ह्यातील पन्नासवर कृषी केंद्रांचे परवाने रद्द
सांगली : कृषी विभागाच्यावतीने गुणवत्ता नियंत्रण अंतर्गत केलेल्या बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीत दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील ४९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २७ कृषी औषध विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. ६६ केंद्रांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
खरीप व रब्बी हंगामाबरोबरच इतरवेळी शेतकऱ्यांना कृषी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके योग्य दरात व दर्जेदार मिळावीत यासाठी नियोजन केले जाते. हंगामाच्या पूर्वी जिल्ह्यातील खते, बियाणांचा आढावा घेऊन, दोष आढळलेल्या कृषी औषध केंद्रांवर कारवाई केली जाते. बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीसाठी प्रत्येकी ११ जणांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील कृषी औषध दुकानांच्या तपासणीत दोष आढळलेल्या दुकानांवर निलंबनासह विक्री बंदची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात बिायाणांचे दोन उत्पादक व १३८६ विक्रेते आहेत. रासायनिक खतांचे २० उत्पादक व १९६० विक्रेते, तर कीटकनाशकांचे ३ उत्पादक व १७८७ विक्रेते आहेत. यांचे मार्चअखेर बियाणांचे ६०२ नमुने घेण्यात आले. लक्षांक म्हणून ६०४ नमुने घेण्यात आले होते. रासायनिक खतांचे ३६२ नमुने घेण्याच्या लक्षांकापोटी ४४७, तर कीटकनाशकांच्या १४५ लक्षांकाच्या पोटी १५४ नमुने तपासण्यात आले आहेत. तपासणी करण्याचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. या पथकाने मार्च २०१६ अखेर जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची तपासणी करून कार्यवाही केली आहे. ४९ परवाने निलंबित केले आहेत. खरीप हंगाम सुरु होण्यास थोडाच अवधी शिल्लक असतानाच, कृषी विभागाने दोषी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)