सहकार मोडीत काढणाऱ्यांना जेलची हवा दाखवू

By Admin | Updated: October 8, 2015 00:39 IST2015-10-07T23:22:59+5:302015-10-08T00:39:39+5:30

सदाभाऊ खोत : गोपीनाथ मुंडे यांच्या इशाऱ्याची करून दिली आठवण, खासगीकरणास विरोध

Let's show the prison inmates who break their co-operation | सहकार मोडीत काढणाऱ्यांना जेलची हवा दाखवू

सहकार मोडीत काढणाऱ्यांना जेलची हवा दाखवू

अशोक पाटील-इस्लामपूर --केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सहकार मोडीत काढणाऱ्यांना जेलची हवा दाखवू, असा इशारा दिला होता. परंतु त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर विस्मरणात गेलेल्या त्या इशाऱ्याची आठवण बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ यांनी करून दिली. त्यांनी मुंडे यांचेच शब्द उचलले असून, जे कारखानदार खासगीकरणाची भाषा करीत असतील, त्यांना भाजप सरकार सोडणार नाही, असा इशारा त्यांनी शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव न घेता दिला.
शिराळ्याच्या विश्वास सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत म्हणाले की, सहकारी संस्थांमध्ये सभासदांचे एकास नऊ भागभांडवल असते. त्यामुळे हा जनतेचा पैसा असतो. साखर उद्योग अडचणीत आल्यानंतर सरकारने वेळोवेळी साखर कारखान्यांना आर्थिक मदत केली आहे. सहकार क्षेत्राला संरक्षणही दिले आहे. निर्यातीला अनुदान दिले आहे. असे असताना कायदा धाब्यावर बसवून सहकार मोडीत काढणाऱ्या साखरसम्राटांना भाजप सरकार सोडणार नाही. जेथे सहकाराची मुहूर्तमेढ रोवली, त्या महाराष्ट्रातील नवे वतनदार सहकार गिळंकृत करीत आहेत. सहकारी संस्था मूठभर लोकांच्या नसून लाखो शेतकऱ्यांच्या आहेत. मात्र काही साखरसम्राटांनी सहकारी संस्था मोडीत काढून त्या खासगी करण्याचा डाव आखला आहे. जे बेकायदेशीर ठराव करत आहेत, सहकारी क्षेत्रात काम करताना कर्तव्यात कसूर व बेजाबदारपणे वागत आहेत, अशांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.
सहकारी कारखाने खासगी करून ते स्वत:च्या मालकीचे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास सभासदांचे हक्कच हिरावून घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर साखर उद्योगाला पूरक असलेल्या सर्वच सहकारी संस्था मोडीत निघण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे या खासगी कारखानदारीला आमचा विरोध राहील. भाजप सरकार अशा साखर सम्राटांविरोधात कडक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई करेल, असाही विश्वास खोत यांनी व्यक्त केला.


सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी १६ आॅक्टोबररोजी कोल्हापूर येथील साखर संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यावेळी कारखाने खासगी करण्याच्या ठरावाविरोधात तीव्र निदर्शने केली जाणार आहेत.


शिराळ््यातील ठरावाबाबत भूमिका काय?
वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर हे सदाभाऊ खोत यांचे गाव. मात्र ते शिराळा विधानसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघाचे माजी आमदार, विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी कारखाना खासगी करण्याचा ठराव करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दणका दिला आहे. आता सदाभाऊ खोत याविरोधात काय आवाज उठविणार, याकडेही ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Let's show the prison inmates who break their co-operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.