इंदूताईंच्या स्त्रीमुक्ती चळवळीचा वसा समर्थपणे चालवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:55+5:302021-07-15T04:19:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्त्रीमुक्तीच्या चळवळीत काम करीत असताना क्रांतिवीरांगणा इंदूताई पाटणकर यांनी नेहमीच बळ दिले. प्रत्येक वेळी ...

इंदूताईंच्या स्त्रीमुक्ती चळवळीचा वसा समर्थपणे चालवू
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : स्त्रीमुक्तीच्या चळवळीत काम करीत असताना क्रांतिवीरांगणा इंदूताई पाटणकर यांनी नेहमीच बळ दिले. प्रत्येक वेळी पाठीवर पडणारी त्यांची थाप ऊर्जा देणारी ठरली. त्यांच्या स्त्रीमुक्ती चळवळीतील कार्याचा वसा यापुढेही समर्थपणे चालवू, असा विश्वास माणदेशी महिला बॅँकेच्या संस्थापक-अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी व्यक्त केला.
कासेगाव (ता. वाळवा) येथे झालेल्या क्रांतिवीरांगणा इंदूताई पाटणकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात सिन्हा अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावर्षी संगमनेर (जि. अहमदनगर) येथील स्त्री मुक्ती चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या अॅड. निशा शिवूरकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. काही नैमित्तिक कारणामुळे त्या येऊ न शकल्याने त्यांच्या वतीने सिन्हा यांनी हा पुरस्कार हमाल, मापाडी पंचायतीचे नेते साथी विकास मगदूम यांच्या हस्ते स्वीकारला. डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विकास मगदूम म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीतील इंदूताई पाटणकर यांचे कार्य तरुणांना लाजवील असे होते. आमच्या चळवळीला त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
डॉ. पाटणकर म्हणाले, कष्टकरी जनतेला चिरडणारी व्यवस्था बेलगाम झाली आहे. सर्वांनी एकजुटीने क्रांतिकारकांचा वारसा जपत अन्यायी व्यवस्थेविरुद्ध संघटितपणे लढा दिला पाहिजे.
कॉ. जयंत निकम यांनी प्रास्ताविक केले. अॅड. बी. डी. पाटील, माजी सभापती रवींद्र बर्डे, सादिक खाटिक यांनी मनोगत व्यक्त केले. आनंदराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी मोहनराव यादव, दिलीप पाटील, मनोहर विभुते, संदुप बने, डी. के. बोडके उपस्थित होते.
चौकट
पुरस्काराप्रती कृतज्ञता
अॅड. निशा शिवूरकर यांनी संदेश पाठवून पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्त्री मुक्तीचा संघर्ष आणि लढा संपलेला नाही. स्त्रियांवरची बंधने वाढत आहेत. संस्कृती रक्षणाच्या नावाने तरुणींवर बंधने घातली जात आहेत. इंदूताईंच्या नावाने दिलेला हा पुरस्कार लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षतेसाठीच्या संघर्षासाठी ताकद आणि ऊर्जा देणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.