बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:42+5:302021-02-05T07:32:42+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वत: सारथ्य केले. फोटो २५ ...

बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वत: सारथ्य केले.
फोटो २५ ट्रॅक्टर रॅली २
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. तो यशस्वी होऊ देणार नाही. प्रसंगी बळीराजाची फौज दिल्लीवर चाल करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅलीच्या प्रारंभावेळी ते बोलत होते.
सांगलीत विश्रामबागमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. जिल्हाभरातून ट्रॅक्टरसह आलेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. केंद्र सरकारविरोधी घोषणांमुळे विश्रामबाग चौक दणाणून गेला.
शेट्टी म्हणाले, केंद्राने राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. शेतकरी व कामगारांवर अन्यायकारी कायदे केले जात आहेत. ते रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. सरकारने अन्यायी कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर सळो की पळो करून सोडू. पत्र्या ठोकण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये.
ते म्हणाले, कृषी कायद्यांना विरोधासाठी मंगळवारी (ता. २६) दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत. आम्हालाही जायचे होते, पण रेल्वेचा मार्ग बंद केला आहे. दक्षिणेकडील शेतकऱ्यांना अडविण्यासाठी वाहने रोखली जात आहेत. त्यामुळे सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा काढावा लागला. मूठभरच शेतकरी कायद्यांविरोधात असल्याचे सरकार भासवत आहे. विरोधी पक्षही सक्रिय नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाच आक्रमक व्हावे लागेल. सरकारचे वर्तन गोऱ्या इंग्रजांप्रमाणे आहे. कवडीमोलाने शेतीमाल खरेदी करून चौपट दराने विकण्याचे कारस्थान आहे. कृषी कायद्यांतून आमचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चौकट
वीजबिल माफ करण्याची मागणी
आंदोलकांनी प्रत्येक ट्रॅक्टरवर कृषी कायद्यांना विरोधाची पोस्टर्स लावली होती. वीजबिल माफ झालेच पाहिजे, अशाही घोषणा सुरू होत्या. सुमारे पन्नासहून अधिक ट्रॅक्टर्स रॅलीमध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे प्रचंड उत्साह संचारला होता. पुष्पराज चौकापासून विश्रामबागेपर्यंत एका रांगेत ट्रॅक्टर्स दिसत होते. राजू शेट्टी स्वत: अग्रभागी ट्रॅक्टर चालवत होते. विश्रामबागेतून पुष्पराज चौक, राम मंदिर, सिटी पोस्ट, शिवाजी मंडई, बसस्थानकमार्गे ती शहराबाहेर कोल्हापूरच्या दिशेने गेली. त्यानंतर जयसिंगपूर, हातकणंगले आदी ठिकाणी शेतकरी सहभागी होत गेले.
------------
--------