पंढरीला जाऊ विजेच्या गाडीने... पण चाचणी झाल्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:44+5:302021-03-07T04:22:44+5:30

सांगली : पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या मिरज ते लातूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत मिरज ते ...

Let's go to Pandhari by electric car ... but only after the test! | पंढरीला जाऊ विजेच्या गाडीने... पण चाचणी झाल्यावरच!

पंढरीला जाऊ विजेच्या गाडीने... पण चाचणी झाल्यावरच!

सांगली : पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या मिरज ते लातूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत मिरज ते कुर्डूवाडीपर्यंतचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, तेथून लातूरपर्यंतचे अंतिम टप्प्यात आहे.

२०११ मध्ये मिरज-पंढरपूर लोहमार्ग ब्रॉडगेज झाल्यानंतर तुलनेने लवकरच म्हणजे पाच-सहा वर्षांतच विद्युतीकरण सुरू झाले. सध्या ढालगाव-सांगोला, सांगोला-पंढरपूर व पंढरपूर ते कुर्डूवाडी या तीन टप्प्यांतील कामे पूर्ण झाली आहेत. त्यांची अंतिम चाचणी मात्र झालेली नाही. केंद्रीय सुरक्षा आयुक्तांकडून ती होणे अपेक्षित आहे. चाचणीअभावी या मार्गावर प्रवासी गाड्या विजेवर पूर्ण क्षमतेने पळविणे शक्य नाही. सध्या काहीवेळा विद्युत इंजिने या मार्गावर नैमित्तिक कामासाठी सोडली जातात. मालगाड्या मात्र डिझेलवरच धावत आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून प्रवासी गाड्या पूर्णत: बंद आहेत. पंधरवड्यापूर्वी कोल्हापूर-धनबाद ही एकमेव गाडी धावली, तीदेखील डिझेलवर सोडण्यात आली होती.

चौकट

दोन वीज उपकेंद्रे

मिरज ते पंढरपूरदरम्यान ढालगाव आणि पंढरपूर येथे वीज उपकेंद्रे आहेत. तेथून गाडीसाठी वीज पुरवली जाईल. कुर्डूवाडी ते लातूरदरम्यान काही ठिकाणी मास्ट पोल व फिटिंग अद्याप अपूर्ण आहे. कुर्डूवाडी यार्ड व उपकेंद्राचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

चौकट

गती व गाड्या वाढतील

मिरज ते लातूरदरम्यान विजेवरील गाड्या सोडण्यास परवानगी मिळाल्यानंतर गाड्यांची गती व संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या ९० ते १०० किलोमीटर प्रतितास या गतीने प्रवासी गाड्या धावतात. ही गती १२० किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढू शकते. त्याशिवाय शटल, एक्सप्रेस, इंटरसिटी व पॅसेंजर गाड्या वाढू शकतात.

चौकट

असा आहे पसारा

मिरज ते ढालगावपर्यंतचे ६३ किलोमीटरचे विद्युतीकरण ६ जानेवारी २०२० रोजी पूर्ण झाले. ढालगाव ते सांगोला (४४.९ किलोमीटर), सांगोला ते पंढरपूर (२९.४ किलोमीटर) व पंढरपूर ते कुर्डूवाडी (५३ किलोमीटर) हे कामदेखील नुकतेच पूर्ण झाले आहे. सुरक्षा आयुक्तांकडून त्यांची चाचणी होणे बाकी आहे. कुर्डूवाडी ते बार्शी (३७ किलोमीटर) व बार्शी ते लातूर (१४९ किलोमीटर) या मार्गाची कामे अद्याप सुरू आहेत.

Web Title: Let's go to Pandhari by electric car ... but only after the test!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.