एकरकमी ऊस बिलासाठी संघर्ष करू

By Admin | Updated: October 6, 2015 00:33 IST2015-10-05T23:39:41+5:302015-10-06T00:33:33+5:30

राजू शेट्टी : साखरसम्राटांना एफआरपीचे तुकडे पाडून टप्पे ठरविण्याचा अधिकार नाही

Let's fight for a lump sum sugarcane bill | एकरकमी ऊस बिलासाठी संघर्ष करू

एकरकमी ऊस बिलासाठी संघर्ष करू


कामेरी : साखरसम्राटांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात ‘एफआरपी’ तीन टप्प्यात देण्याचा ठराव मंजूर केला असला तरी, तो त्यांचा अधिकार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना एफआरपीचे तुकडे करु देणार नाही. ऊस उत्पादकांना एकरकमी बिल मिळण्यासाठी प्रसंगी संघर्ष करू, असे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी केले.
कामेरी (ता. वाळवा) येथे हरिजन पाणंद रस्त्याचे उद्घाटन खा. शेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ. नाईक यांच्याहस्ते मोंडे पाणंद रस्ता कामाचे भूमिपूजन घेण्यात आले.
खा. शेट्टी म्हणाले, गत हंगामात २७00 रुपयांवर तडजोड करुन ऊस दर आंदोलन मागे घेतले, म्हणून माझा निषेध करणाऱ्यांनी २२00 पेक्षा जास्त दर का दिला नाही? शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात वारणा वगळता सर्वांनी एफआरपीप्रमाणे दर दिला. मग सांगली जिल्ह्यात असे का झाले नाही? याचे उत्तर प्रथम सभासदांना द्या, मग शेतकरी संघटनेची मापे काढा. एफआरपी ठरविण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे, राज्य शासन अथवा कारखानदारांना नाही. म्हणून एफआरपीचे तुकडे करुन पैसे हातात देण्याचा कट आम्ही उधळून लावू. यासाठी १६ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
आ. शिवाजीराव नाईक यांच्या स्थानिक रस्ते विकास कार्यक़्रमातून १२ लाख व खा. शेट्टी यांच्या फंडातून ७ लाख रुपये हरिजन पाणंद रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते.
यावेळी दि. बा. पाटील, सिनेअभिनेते विलास रकटे, ग्रा.पं. सदस्य मनोज पाटील, राजेंद्र पाटील, उत्तम पाटील, सर्कल जे. एम. गातपाटील, बंडाकाका पाटील, ए. टी. ठोंबरे, सज्जनराव पाटील, एस. आर. पाटील, संताजी पाटील, हेमंत पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशवंत ग्लुकोजचे संचालक शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले, शेतकरी संघटनेचे खाशेराव निंबाळकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)


पक्षी अभयारण्यासाठी प्रयत्न करणार
यावेळी आमदार नाईक यांनी कामेरी येथे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या तलावाची पाहणी केली व त्याठिकाणी सर्व सोयींनीयुक्त असा बोटिंग क्लब व बगीचा करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय महामार्गालगतच्या तलावातील गाळ काढून तलावाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. यामुळे परिसरात एक नवीन व देखणे पर्यटनस्थळ निंर्माण होऊन अर्थकारणालाही गती मिळेल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याठिकाणी पर्यटन केंद्र करुन बोटिंग क्लब तयार तयार करण्यात येणार आहे. तलावाचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे पक्षी अभयारण्यामुळे पक्षीप्रेमींही या भागाकडे आकर्षित होतील, तसेच त्यासमोरील चार एकर जागेत बगीचा व पक्षी अभयारण्य निर्माण करण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली. एकूणच हा प्रकल्प तालुक्यासाठी लाभदायक ठरेल, असे ते म्हणाले.

Web Title: Let's fight for a lump sum sugarcane bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.