वीज बिल प्रश्नावर मंत्र्यांच्या गाड्या अडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:01+5:302021-07-04T04:19:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लाॅकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणास्तव लगेच तोडू नये, अशी ...

वीज बिल प्रश्नावर मंत्र्यांच्या गाड्या अडवू
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लाॅकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणास्तव लगेच तोडू नये, अशी मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली.
पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगली महावितरणच्या शहर कार्यालयात कार्यकारी अभियंता विनायक ईदाते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पवार म्हणाले की, लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. त्यातच महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडले जात आहे. ही कारवाई तत्काळ थांबवावी.
महावितरण अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या कक्षेत ज्या ग्राहकांची बिल भरण्याची अजिबात परिस्थिती नाही, अशांना बिलापोटी एक ठरावीक रक्कम भरून घेऊन उर्वरित रक्कम दोन ते तीन हप्ते बांधून देण्याचा प्रयत्न आहे. शिष्टमंडळाच्या मागणीप्रमाणे जर १२ ते २४ हप्ते स्थिर आकार, दंड व्याज, वीज बिल व वीज शुल्क करून माफ करून घ्यायचे असेल तर ही बाब वरिष्ठ पातळीवर मान्यतेसाठी पाठवून सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
आंदोलन करण्याचा इशारा
पवार म्हणाले की, हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील असल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेला घेऊन राज्य सरकारकडे संविधानिक अधिकारातून पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरुन मंत्र्यांच्या गाड्या अडवून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.