वस्त्रोद्योगातील अडचणींवर उपाययोजना करू
By Admin | Updated: September 17, 2015 23:43 IST2015-09-17T23:11:30+5:302015-09-17T23:43:36+5:30
चंद्रकांतदादा पाटील : सागरेश्वर सूतगिरणीस भेट

वस्त्रोद्योगातील अडचणींवर उपाययोजना करू
कडेगाव : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या अडचणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या उद्योगाच्या वाढीसाठी व संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणार आहे, अशी ग्वाही सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील यांनी कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूतगिरणीला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, महेंद्र लाड यांनी सूतगिरण्यांच्या अडचणींबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा केली.
यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले की, महाराष्ट्रातील वाढते विजेचे दर, जगातील बाजारपेठेच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाढत चाललेला कापूस दर, चुकीच्या आयात-निर्यात धोरणाने सुताची थांबलेली निर्यात, देशात वाढलेला सुताचा दर यामुळे सहकारी सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. दिलीपतात्या पाटील यांनी, या व्यवसायासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे कार्यकारी संचालक ए. बी. चालुक्य उपस्थित होते. सूतगिरण्यांच्या प्रश्नावर उपाययोजना झाल्या पाहिजेत. वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादांनी मनावर घेतल्यास सूतगिरण्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे मत पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)