‘टेंभू’च्या पाण्याने आबांचे स्वप्न साकारू
By Admin | Updated: April 30, 2016 00:50 IST2016-04-29T23:21:13+5:302016-04-30T00:50:12+5:30
सुमनताई पाटील : बेलवन ओढ्यात पाण्याचे पूजन; ग्रामस्थांची सभा

‘टेंभू’च्या पाण्याने आबांचे स्वप्न साकारू
ढालगाव : ‘टेंभू’च्या लाभक्षेत्रातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणून आबांचे स्पप्न पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आ. सुमनताई पाटील यांनी केले. नागज (कवठेमहांकाळ) येथील बेलवन ओढ्यात टेंभू योजनेच्या पाण्याचे विधिवत पूजन केल्यानंतर सिध्दनाथ मंदिराजवळ झालेल्या सभेत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे होते. सगरे म्हणाले की, टेंभू योजनेत ढालगावसह परिसरातील आठ गावांचा समावेश आर. आर. (आबा) पाटील यांनीच केला, ही वस्तुस्थिती आहे. यापुढील काळात उर्वरित गावांना जलदगतीने पाणी देण्यासाठी आमदार पाटील प्रयत्न करतील.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, जालिंदर देसाई, बाजार समितीचे माजी उपसभापती कोंडाजी पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक अविनाश यमगर आदींनी भाषणात, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांचे नाव व घेता टीकेची झोड उठविली. कोंडाजी पाटील म्हणाले की, ज्या झाडाच्या सावलीखाली वाढला, त्याच्यावरच घाव घालता! टेंभूचे श्रेय हे शिवाजीराव शेंडगे (बापू), विठ्ठलदाजी पाटील, अजितराव घोरपडे व आर. आर. पाटील आबांचे आहे. मग आपण नारळ कशासाठी फोडता?
अविनाश अमगर म्हणाले की, शेंडगे बापू, घोरपडे सरकार, आबा आणि आता संजयकाका अशी तुमची निष्ठा आहे. आम्ही सांगली, चोरोचीत राहिलो, तरी निष्ठा बदलली नाही. तुम्ही तुमची निष्ठा तपासा.
यावेळी जिल्हा परिषद सभापती भाऊसाहेब पाटील, पं. स. उपसभापती जगन्नाथ कोळेकर, दत्ताजी पाटील, चोरोचीचे राजाराम पाटील, घाटनांद्रेहून सरपंच अमर शिंदे, कदमवाडी सरपंच सुभाष खांडेकर, माजी सभापती सुरेखा कोळेकर, किसन टोणे, जांभुळवाडीचे सरपंच संजय दार्इंगडे, चुडेखिंडीचे विठ्ठल पाटील, घोरपडीचे अशोक मलमे, पांडुरंग यमगर, गणेश पाटील, ढालगावचे कुमार पाटील, पोपट शेटे, संजय पाटील, निमजचे विश्वनाथ रुपनर, नागजचे पोपट शिंदे, सुधीर पाटील यांच्यासह शिंदेवाडीचे बंडू पाटील, धर्मराज रुपनर उपस्थित होते. प्रास्ताविक संजय सूर्यवंशी यांनी केले. (वार्ताहर)