राम शिंदेंच्या सभेस भाजप नेत्यांची पाठ
By Admin | Updated: October 25, 2015 23:32 IST2015-10-25T22:45:14+5:302015-10-25T23:32:25+5:30
गैरहजेरीची दखल : काही नेते राष्ट्रवादीच्या वळचणीला असल्याची चर्चा

राम शिंदेंच्या सभेस भाजप नेत्यांची पाठ
अशोक पाटील- इस्लामपूर वाळवा, शिराळा तालुका म्हणजे राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात इस्लामपूर शहरात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. परंतु या सत्काराकडे शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक वगळता उर्वरित भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवली. यामुळे सभास्थळी असलेल्या उपस्थितांमध्ये भाजपचे काही नेते राष्ट्रवादीच्या वळचणीला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
इस्लामपूर मतदारसंघावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थाही राष्ट्रवादीकडे आहेत. याच मतदारसंघातील भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील आणि भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी हे दोघेच भाजपमध्ये निष्ठेने कार्यरत आहेत. परंतु या दोघांमध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची वाताहत होत चालली आहे.
शिराळा मतदारसंघातील राजकारण स्थीर नाही. पक्षापेक्षा गटा-तटालाच येथे महत्त्व आहे. आपला नेता म्हणजे आपला पक्ष, या भावनेवर येथील राजकारण चालते. या मतदारसंघात सध्या तरी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आ. शिवाजीराव नाईक भाजपमध्ये आहेत म्हणून भाजप असे राजकीय समीकरण आहे. मात्र शिराळ्यातील जनता शिवाजीराव नाईक यांच्यावर वैयक्तिक पातळीवर प्रेम करते. त्यामुळे या मतदारसंघातील शिवाजीराव नाईक यांचा गट म्हणजेच विकास आघाडी या रूपाने सक्रिय आहे. त्यामुळे नाईक भाजपमध्ये असले तरी, कार्यकर्त्यांची मानसिकता मात्र भाजपमध्ये येण्याची नाही. त्यामुळे शिराळा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
या कार्यक़्रमावेळी आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद सक्षम असल्याचे सांगितले. दोन खासदार म्हणजे भाजपचे खा. संजय पाटील, स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी आणि चार आमदार यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका आपण सहज जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.
परंतु जिल्ह्यातील मोदी लाटेवर झालेले खासदार, काही आमदार हे राष्ट्रवादीच्या वळचणीला असतात. त्यामुळेच या खासदार, आमदारांनी इस्लामपुरातील मंत्री राम शिंदे यांच्या नागरी सत्काराकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. सायंकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आलेला सत्काराचा कार्यक्रम तब्बल ३ तास उशिरा सुरू झाल्याने याचाही गर्दीवर परिणाम झाला.
इस्लामपुरातील सर्वच प्रमुख भाजपच्या कार्यकर्त्यांनी या सत्कार सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. कार्यक़्रमाचे संयोजन एकमेव विक्रमभाऊ पाटील यांनी स्वत:च्या ताकदीवर केले होते. पाटील यांना आमदार शिवाजीराव नाईक यांचा पाठिंबा वगळता अन्य भाजप नेत्यांनी साथ दिली नाही. जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी त्यांची का दखल घेतली नाही, हा प्रश्न आज तरी गुलदस्त्यात आहे.
चर्चा तर होणारच..!
जयंत पाटील यांनी सलग १५ वर्षे मंत्रीपद भूषविल्याने इस्लामपूरकरांना मंत्रीपदाचे फारसे अप्रूप नाही. पण विरोधी पक्षाचे राज्यमंत्री शहरात येत असल्याने त्यांना नेमका कसा प्रतिसाद मिळणार, याची उत्सुकता होती. त्यामुळे कार्यकर्ते ‘चर्चा तर होणारच..!’ असा सूर आळवताना दिसत होते.
पालिकेत चर्चा : विजय कुंभारही अनुपस्थित
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते विजय कुंभार हेही मंत्री राम शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. एरव्ही नगरपालिकेचे सत्ताधारी व आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात टीका करणारे कुंभार शनिवारच्या कार्यक़्रमात कोठेच दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती.
गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन अचानकपणे ठरले. दोनच दिवसात या कार्यक्रमाची तयारी केली होती. नियोजित कार्यक्रमामुळे आमच्या खासदार, आमदारांना कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. तसेच मंत्री शिंदे यांना दौऱ्यातील इतर कार्यक्रमांमुळे इस्लामपूर येथे येण्यास वेळ झाला. तरीसुध्दा आमच्या नागरी सत्कार कार्यक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
- विक्रम पाटील,
प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमो.