सांगलीत भरचौकात बिबट्याचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST2021-04-01T04:28:01+5:302021-04-01T04:28:01+5:30
सांगली : शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौकात बुधवारी बिबट्याचा थरार अनुभवण्यास आला. याच भागात असलेल्या पडक्या इमारतीत तो लपून बसल्याने ...

सांगलीत भरचौकात बिबट्याचा थरार
सांगली : शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौकात बुधवारी बिबट्याचा थरार अनुभवण्यास आला. याच भागात असलेल्या पडक्या इमारतीत तो लपून बसल्याने वनविभागाचे पथक त्याला पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होते. शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या आल्याने त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अखेर प्रशासनाला या भागात जमावबंदी आदेश लागू करावे लागले.
सांगलीत मध्यवर्ती ठिकाणी राजवाडा चौक असून, तो नेहमीच गजबजलेला असतो. सकाळी सव्वासातला तेथील महापालिकेच्या शॉपिंग काॅम्प्लेक्सजवळ असलेल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक दहाच्या कौलांवरून बिबट्याने खाली उडी घेत रस्त्यावर प्रवेश केला. सकाळची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. तेथील चहा विक्रेत्याने प्रथम बिबट्याला पाहिले. क्षणार्धात बिबट्या रस्ता ओलांडत उडी मारून पडक्या इमारतीत घुसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे पथक दाखल झाले. पडक्या इमारतीमध्ये अडगळीत बिबट्या असल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. यासाठी वन विभागाने या संपूर्ण इमारतीला जाळी लावून घेतली. इमारतीच्या प्रवेशद्वारात पिंजरा ठेवला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याला पकडण्यासाठी वन विभाग, वन्यजीव विभागाचे पथक प्रयत्नशील होते.