सांगली : वेळ रात्री साडेबाराची... मिरजेहून एक दाम्पत्य दुचाकीवरून सांग सांगलीकडे येत होते. भारती हॉस्पिटलजवळ त्यांना बिबट्या दिसला. त्याला पाहून दाम्पत्य दचकले. गाडी थांबली. बिबट्याने रस्ता ओलांडून मोकळ्या प्लॉटमधील झाडाझुडपात गेला. थोड्याच अंतरावर पोलिसांची पेट्रोलिंग गाडी होती. दाम्पत्याने पोलिसांना बिबट्याची माहिती दिली. पेट्रोलिंगवरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनीही बिबट्या पाहिला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. तेही रात्रीच दाखल झाले. पण तोपर्यंत बिबट्या गायब होता.
शिराळा, वाळव्यासह जंगल परिसरात आढळणारा बिबट्या आता मिरज-सांगली या शहरी भागातही दिसू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मिरजेत जुन्या हरिपूर रस्त्यावर तो फिरताना रहिवाशांना दिसून आला. वनविभागाने पाहणी केली असता बिबट्याचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर सांगली- मिरज रस्त्यावर भारती रुग्णालया समोरील रस्त्यावर बिबट्या जाताना दुचाकीस्वाराने पाहिले. रात्रगस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांनी माहिती दिली. त्याची माहिती वनविभागाला दिली. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव हेही वानलेसवाडी परिसरात दाखल झाले. त्यानंतर पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे चारपर्यंत हा परिसर धुंडाळला, पण बिबट्या आढळला नाही. मिरज ते जुना हरिपूर रस्ता या परिसरातील ढोर मळा, संविधान कॉलनी, कुंभार मळा, तोडकर मळा या भागात बिबट्या रात्री फिरताना नागरिकांना आढळला आहे. शुक्रवारी रात्री संविधान कॉलनीतील एका बंगल्याच्या परिसरात बिबट्या फिरत असताना कुटुंबातील महिलेने पाहिले. परिक्षेत्र वन अधिकारी सर्जेराव सोनवडेकर, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, सचिन साळुंखे, वनपाल सुधीर सोनवले, वनरक्षक गणेश भोसले, प्राणीमित्र सत्यजित पाटील, किरण नाईक, दिलीप शिंगाणा आदींनी विजयनगर ते मिरज रस्त्यावर रेल्वे उड्डाण पुलापर्यंत शोधमोहीम राबविली. वालचंद महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसून आला. याच परिसरातील एका शेतात बिबट्याच्या केसांचा पुंजकाही आढळून आला.
कायमचा रहिवासी ?
मिरज ते जुना हरिपूर रस्त्यावर गेल्या तीन-चार वर्षांपासून बिबट्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवत आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. तत्पूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये बिबट्या आढळून आला होता. या भागात उसाची दाट शेती आहे. त्यामुळे त्याला लपून राहण्यासाठी हा परिसर सोयीचा आहे. सध्या सर्वत्र उसाची तोड सुरू असल्याने तो बाहेर पडून नागरिकांच्या नजरेस पडत आहे. हा बिबट्या जंगलक्षेत्रातून आला नसून तो स्थानिक रहिवासीच असावा असा प्राणीमित्रांचा अंदाज आहे.
मिरज ते वालनेस वाडी परिसरातील कुंभार मळा येथे संविधान कॉलनी परिसरात बिबट्याचे ठसे आढळलेआहेत. सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी बिबट्याचा मुक्त वावर सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
सांगलीत अनेक वन्यप्राण्यांचा वावर
अर्थात, सांगलीत वन्यप्राण्यांचा वावर शहरवासीयांना नवा नाही. दोन वर्षांपूर्वीही एका बिबट्याने भल्या पहाटे सांगलीकरांची झोप उडवली होती. राजवाडा परिसरात अवतरलेला बिबट्या पटेल चौकातील एका इमारतीत पत्र्याच्या आडोशाला लपला.सांगलीत कृषी उत्पन्न बाजार 3 समितीत भलामोठा गवा अवतरला होता. वनविभागाने अत्यंत योजनाबद्धरीत्या त्याला पकडले. त्याची सुरक्षितरित्या चांदोलीच्या जंगलात खानगी केली.
विश्रामबागमध्येही गव्हर्मेन्ट कॉलनी परिसरात दोन-तीन वर्षांपूर्वी रात्री गवा आला होता.
सांगलीवाडीत व सांगलीत शासकीय रुग्णालयाच्च्या पिछाडीला त्याला वावर दिसून आला होता. संजयनगरमध्ये चार वर्षांपूर्वी एका शाळेत सांबर शिरले होते, बचाव करताना त्याचा मृत्यू झाला होत. कुपवाड रस्त्यावर भारत सूतगिरणी जवळही एकदा सांबर दिसून आले होते.
रविवारी रात्री उशिरापर्यंत वानलेसवाडी परिसरात आम्ही शोधमोहीम राबविली. पण बिबट्याचा वावर आढळला नाही. सोमवारी रात्रीही आमचे पथक शोध घेणार आहे. गरजेनुसार या परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रण पाहिले जाईल. त्याचा फिरण्याचा मार्ग लक्षात आल्यास आमचेही कॅमेरे लावू. या परिसर दाट शेतीचा असल्याने वावर शक्य आहे.
सर्जेराव सोनवडेकर, परिक्षेत्र वनाधिकारी
बिळाशी : धसवाडी (ता. शिराळा) येथे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक बिबट्या दिसल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. शाळा-अंगणवाडीकडे जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली असून पालकांनी कसरत करून मुलांना जनावरांना वैरणीच्या गाड्यांतूनच शाळेत पोहोचवले.
मनीषा मारुती सागावकर आणि बाळाबाई विश्वास सागावकर या दोघी दूध घालण्यासाठी धसवाडीकडे जात असताना रस्त्यावरून बिबट्या दोघींच्या मधूनच निघून गेल्याने त्या आरडाओरडा करू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून अमित विश्वास धस हे रस्त्यावर आले आणि त्यांनाही बिबट्या त्यांच्या निर्दशनास आल्याचे सांगितले. काही क्षणांतच बिबट्याबाबतची माहिती गावभर सोशल मीडियावरून पसरली आणि सर्वत्र खळबळ उडाली. परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
बंदोबस्त करण्याची मागणी
या घटनेनंतर सरपंच राजाराम चंद्र धस यांनी वनविभागाशी तातडीने संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. सरपंच धस म्हणाले, जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे आणि शाळा डोंगरालगत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे तातडीने संरक्षणात्मक वॉल कंपाऊंड उभारणे अत्यावश्यक आहे.
शाळकरी मुलांच्या जीविताचा प्रश्न गंभीर
सागावकर वस्तीपासून धसवाडी प्राथमिक शाळा व अंगणवाडीपर्यंतचे अंतर लांब असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वीच परिसरात बिबट्याचा वावर दिसल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले होते. म्हणूनच पालकांनी धोका टाळण्यासाठी मुलांना वाहनांद्वारे थेट शाळेत पोहोचवले.
धसवाडी (ता. शिराळा) येथे सोमवारी सकाळीच बिबट्या दिसल्याने विद्यार्थ्यांना पालकांनी चक्क वैरणीच्या गाड्यातून आणून शाळेत सोडले.
Web Summary : A leopard sighting in Sangli, near Bharti Hospital, sparked panic. Forest officials launched a search after residents reported multiple sightings in Miraj and surrounding areas. The leopard's presence near residential areas raises concerns for citizen safety, especially for children going to school.
Web Summary : सांगली में भारती अस्पताल के पास तेंदुए के दिखने से दहशत फैल गई। वन विभाग ने मिरज और आसपास के इलाकों में कई बार देखे जाने की सूचना मिलने के बाद तलाशी शुरू कर दी। रिहायशी इलाकों के पास तेंदुए की मौजूदगी से नागरिकों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।