तडवळेत बिबट्या-मानव सहजीवन जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:53+5:302021-09-10T04:33:53+5:30
शिराळा : तडवळे (ता. शिराळा) या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्ग सौंदर्याने संपन्न गावामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे दर्शन ...

तडवळेत बिबट्या-मानव सहजीवन जनजागृती कार्यक्रम
शिराळा : तडवळे (ता. शिराळा) या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्ग सौंदर्याने संपन्न गावामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले झाल्याच्या नोंदीही आहेत. या घटनांमुळे तडवळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, पर्यावरण संवर्धन विषयावर काम करणाऱ्या प्लॅनेट अर्थ फाउंडेशन व प्रादेशिक वनविभागातर्फे ग्रामपंचायतीमध्ये "मानव बिबट्या सहजीवन" जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या माध्यमातून बिबट्याबद्दलची भीती व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थेच्या अभ्यासानुसार बिबट्याने ऊस शेतीस आपला अधिवास बनवला आहे. उसातच तो प्रजनन करत आहे. गावातील मोकाट कुत्रे, जनावरे, तसेच उसात सापडणारे मोर, वानर, डुक्कर अशा प्राण्यांवर तो गुजराण करत आहे. मनुष्य हे बिबट्याचे अन्न नसल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. काही ठिकाणी बिबट्याने बकरी, रेडकू, कालवड मारल्याच्या घटना आहेत. त्यासाठी बंदिस्त गोठा बनवणे व आपल्या प्राण्यांना बिबट्यापासून सुरक्षित ठेवणे हाच योग्य पर्याय आहे.
या जनजागृती कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी वनविभागाचे हनमंत पाटील, बाबा गायकवाड, प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील, उपाध्यक्ष प्रणव महाजन, प्रथमेश शिंदे उपस्थित होते.