सांगलीत बिबट्याची एंट्री आणि सांगलीकरांची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:59+5:302021-04-01T04:27:59+5:30
शरद जाधव सांगली : नेहमी गर्दीने ओसंडून वाहणारा सांगली शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौक ते पटेल चौक रस्ता बुधवारी संचारबंदीमुळे ...

सांगलीत बिबट्याची एंट्री आणि सांगलीकरांची उत्सुकता
शरद जाधव
सांगली : नेहमी गर्दीने ओसंडून वाहणारा सांगली शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौक ते पटेल चौक रस्ता बुधवारी संचारबंदीमुळे गप्पगार होता. कारण आजवर गवा, सांबर अनुभवलेल्या सांगलीकरांना तेथे बिबट्याचा थरार अनुभवण्यास मिळत होता. राजवाडा चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या शेजारच्या पडक्या इमारतीत दिवसभर बिबट्याच्या वास्तव्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले होते. जमावबंदीचे कलम १४४ लागू असतानाही चौकाच्या प्रवेशद्वारावर मात्र बघ्यांची गर्दी होती.
सांगलीकरांची बुधवारची सकाळ सुरू झाली तीच बिबट्याच्या आगमनाच्या बातमीने. मात्र, अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. अनेकजण तर ‘भावा, कशाला एक दिवस अगोदरच एप्रिल फूल करायलास’ म्हणून विषय टाळत होते, तर काहींनी दुसरा प्राणी असेल असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी त्याचे वर्णन सांगितल्यानंतर राजवाडा चौकात गर्दी होऊ लागली. ती रात्रीपर्यंत कायम होती.
चौकट
घटनाक्रम
सकाळी ७.१५ महापालिकेच्या शाळा क्रमांक १० च्या कौलावरून रस्त्यावर उडी घेत बिबट्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या पडक्या इमारतीत घुसला.
सकाळी ७.३० स्थानिक नागरिकांची पोलिसांना माहिती
सकाळी ८.०० शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व नगरसेवक घटनास्थळी
सकाळी ९.०० वनविभागाचे पथक घटनास्थळी
सकाळी १० वाजता सर्व परिसर रहदारीसाठी बंद
सकाळी ११ वाजता वन्यजीव विभागाचे पथक दाखल
सकाळी ११.३० वाजता वन्यजीव विभागाचे शूटर दाखल
दुपारी १२ वाजता बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्यात आला
दुपारी १ वाजता पडीक इमारतीत जाण्याचा पथकाचा प्रयत्न
दुपारी ४ वाजता शूटरकडून चाचपणी
सायंकाळी ६ वाजता पथकाकडून पुन्हा चाचपणी, पण अपयश
चौकट
राजवाडा चौकात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला लागूनच महापालिकेची शाळा क्रमांक दहा आहे. या शाळेसमोर नामदेव खामकर यांची चहाची टपरी आहे. बुधवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी टपरी सुरू करत चहाची तयारी सुरू केली होती. सव्वासातच्या सुमारास कुणीतरी शाळेच्या कौलावरून खाली उडी मारल्याचे त्यांच्या लक्षात आले मात्र, माकडे असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही क्षणातच त्यांच्यापासून अवघ्या दहा फुटावरून बिबट्या निवांतपणे रस्त्यावर आला. तिथून त्याने कीर्ती मेडिकल व सांगली इलेक्ट्रो केबल या दोन्ही दुकानांच्या मध्ये असलेल्या पडीक इमारतीत उडी घेतली. किमान १५ फूट उंचीचा पत्रा असतानाही त्याने उडी घेतली. काही क्षणातच हे घडल्यानंतर खामकर व शेजारच्या उद्यानात असलेल्या काहींनी पोलीस व स्थानिक नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांना माहिती दिली.
चौकट
बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
बिबट्याने सर्वात प्रथम शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यावर बसलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यात कुत्रे मृत झाल्यानंतर तिथूनच टेरेसवर येत कौलारू इमारतीवर उडी घेतली. यावेळी बिबट्याचे पाय रक्ताने माखल्याने पायऱ्यांवर त्याचे ठसे उमटले होते. याच शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गेटजवळ अनेक बेघर बसलेले असतात. त्यामुळे आणि या इमारतीत असलेल्या कुरिअर कंपनीच्या कार्यालयातील वर्दळीमुळे बिबट्याने कुत्र्याला फस्त न करता तिथून उडी घेतली.
चौकट
पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसर सील करून वर्दळ कमी केली. वनविभागाचे पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यासह महापालिकेचे अग्निशमन दलाचेही पथक थांबून होते. वनविभागाच्या पथकाने सर्वप्रथम बिबट्या असलेल्या परिसराला जाळीने बंदिस्त केले. त्याने जिथून उडी घेतली, तिथेही जाळी लावण्यात आली. नंतर बिबट्या असलेल्या इमारतीच्या दरवाजाला पाठीमागून पिंजरा लावण्यात आला.
कोट
सांगलीत बिबट्या आल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक दाखल झाले. यासह वन्यजीव विभागालाही पाचारण करण्यात आले. बिबट्याला इजा न पोहोचता त्याला पकडण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुहास धानके, वनसंरक्षक,
कोट
बिबट्या आल्याची माहिती मिळताच तातडीने हा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पोलिसांची जादा कुमकही मागविण्यात आली. याशिवाय राज्य राखीव दलाचीही तुकडी तैनात करण्यात आली होती. संपूर्ण परिसर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्याने शोधकार्यात अडचणी आल्या नाहीत.
- अजय सिंदकर, पोलीस निरीक्षक