सांगलीत पकडलेल्या बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST2021-04-02T04:26:45+5:302021-04-02T04:26:45+5:30
कुपवाड : सांगलीतील राजवाडा चौकात चौदा तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात आलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे नैसर्गिक अधिवासात सोडले. ...

सांगलीत पकडलेल्या बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात
कुपवाड : सांगलीतील राजवाडा चौकात चौदा तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात आलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे नैसर्गिक अधिवासात सोडले. तत्पूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती वनसंरक्षक प्रमोद धानके यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
सांगलीतील राजवाडा चौकात बुधवारी सकाळी बिबट्या शिरल्याचे काही व्यावसायिक व नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर धास्तीने नागरिकांचा थरकाप उडाला. नागरिकांकडून वनविभाग, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून तिन्ही विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने जाळी आणि पिंजरे लावले. चौदा तासाच्या प्रयत्नानंतर रात्री बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले.
त्या बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी कुपवाडमधील वनविभागात आणण्यात आले. तो बुधवारी रात्री किंवा पहाटे जंगलातून भरकटल्याने अथवा भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत आल्याचा असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. मात्र, वनविभागाकडून हा बिबट्या कोठून आला असावा याचा निश्चित अंदाज वर्तवता येत नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट
वन्यप्राणी दिसल्यास वनविभागाशी संपर्क करा : बाबूराव शिंदे
नैसर्गिक अधिवासातून किंवा उसाची तोड झाल्यामुळे एखादा वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात किंवा भरकटून मानवी वस्तीत आल्यावर नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा. त्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवू नये, असे आवाहन सांगलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बाबूराव शिंदे यांनी केले आहे.
चौकट
अन्यथा अनर्थ घडला असता
वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला अथक प्रयत्नानंतर पकडण्यात आले. या मोहिमेत थोडा जरी विस्कळीतपणा झाला असता अथवा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती, तर बिकट परिस्थिती उद्भवली असती, असे मत प्रमोद धानके यांनी व्यक्त केले.