सदाभाऊंचे कासेगावात विधानसभेचे रणशिंग जयंत पाटील ‘टार्गेट’ : इस्लामपूर, शिराळ्यात भाजपचा आमदार निवडून आणण्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:23 IST2018-03-29T01:23:55+5:302018-03-29T01:23:55+5:30
कासेगाव : कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे ‘होम पिच’ असलेल्या कासेगाव येथेच त्यांना ‘टार्गेट’ करून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

सदाभाऊंचे कासेगावात विधानसभेचे रणशिंग जयंत पाटील ‘टार्गेट’ : इस्लामपूर, शिराळ्यात भाजपचा आमदार निवडून आणण्याचा दावा
प्रताप बडेकर ।
कासेगाव : कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे ‘होम पिच’ असलेल्या कासेगाव येथेच त्यांना ‘टार्गेट’ करून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी झालेल्या भाषणामध्ये त्यांनी आवर्जून इस्लामपूर आणि शिराळ्यामध्ये भाजपचाच आमदार असेल, असे जाहीर करून आ. पाटील यांना आव्हान दिले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वर्षाहून अधिक कालावधी असला तरी, वाळवा आणि शिराळा तालुक्यात आतापासूनच याचे वारे वाहू लागले आहेत. अनेक इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इस्लामपूर मतदार संघात तर आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जोरदार व्यूहरचना सुरू आहे. यामध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी आहेत. काहीही झाले तरी यावेळी आमदार जयंत पाटील यांचा पराभव करायचा, असाच कानमंत्र त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिला आहे. त्यामुळेच त्यांनी तालुक्यात विकासकामांचा धुमधडाका सुरू केला आहे. भाजपनेही निधी कमी पडू न देता ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू केली आहेत.
चार दिवसांपूर्वी कासेगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजनानंतर झालेल्या जाहीर सभेत मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर खरमरीत टीका करत आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुलच वाजवला आहे. वाळवा-शिराळा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. वाळवा तालुक्यातील ४८ गावे शिराळा मतदार संघात समाविष्ट आहेत. त्यामुळे या गावांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत आलेली आहे.
शिराळा विधानसभा मतदार संघातून विद्यमान आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि सदाभाऊ खोत यांनी शिराळा मतदार संघातील मोठ्या मोठ्या गावात विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला असून, आगामी निवडणूक आपलीच असेल, असा दावा केला आहे. त्यातच माजी जि. प. सदस्य, महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
यासाठीच त्यांनी शिराळा येथे भव्य प्रमाणात नोकरी मेळावा घेतला होता. याच कार्यक्रमात आमदार नीतेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाची उमेदवारी सम्राट महाडिक यांना जाहीर करून टाकली. यावेळी काहीही झाले तरी मैदानात उतरणार, असा पवित्रा महाडिक यांनी घेतला आहे. आता सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसणार, याबाबतच राजकीय वर्तुळातून मंथन सुरू आहे.
इस्लामपूर मतदार संघात आ. जयंत पाटील यांच्याविरोधात कोण लढणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब नाही. परंतु नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सदाभाऊ खोत हेच सध्यातरी दोन चांगले पर्याय भाजपपुढे आहेत. निवडणुकीसाठी अजून कालावधी असल्यामुळे अंतिम क्षणी नेमका कोण उमेदवार असणार, हे सांगता येत नाही.लोकसभा निवडणुकीच्या गणितावर विधानसभेची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. एकंदरीत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्या कासेगावातून त्यांना आव्हान देऊन आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवल्याची चर्चा आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा देत उमेदवारी माघार घेतली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला होता. यावेळी मानसिंगराव नाईक यांनी सत्यजित देशमुख यांच्यासाठी माघार घेऊन पैरा फेडावा.
- जयदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कृषी सेल, सांगली.