आष्ट्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात मेंढ्या सोडल्या
By Admin | Updated: September 11, 2014 00:02 IST2014-09-10T23:06:45+5:302014-09-11T00:02:56+5:30
मेंढपाळ संतप्त : देवीची साथ सुरूच; अद्याप लस उपलब्ध नाही

आष्ट्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात मेंढ्या सोडल्या
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील धनगर समाजाच्या मेंढपाळांच्या मेंढ्यांना १५ दिवसांपासून सुरू असलेली ‘देवी’ रोगाची लागण आटोक्यात आणण्यात जिल्हा पशुवैद्यकीय विभागाला अपयश आल्याने आज (बुधवारी) मेंढपाळांनी देवीची लागण झालेल्या मेंढ्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सोडल्या.
दोन दिवसात नव्याने आणखी १० मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर १०० मेंढ्यांना देवीची लागण झाली आहे. यामुळे जीवित व वित्तहानीमुळे मेंढपाळांचे कंबरडे मोडले आहे. शासनाकडून अद्याप कोणतीच मदत न मिळाल्याने मेंढपाळ हवालदिल झाले आहेत. दरम्यान, सातव्या दिवशीही दवाखान्यात देवीची लस उपलब्ध नव्हती.
आष्टा व परिसरातील मेंढ्यांना दोन महिन्यांपासून देवी रोगाची लागण झाली आहे. उच्च ताप, अंगावर फोड, नाकातून शेंब गळणे आदींमुळे मेंढ्या दगावत आहेत. धनाजी हजारे, हणमंत डोंबाळे, शिवाजी हजारे, सागर डोंबाळे, राहुल लांडगे यांच्या १६० मेंढ्या दगावल्या आहेत. पशुवैद्यकीय पथकाकडून प्राथमिक उपचार झाले; मात्र साथ आटोक्यात नाही. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्तजल व स्कॅपचे नमुने पुणे येथे पाठविले आहेत. आठ दिवसांपासून नमुन्याचे निदान लागलेले नाही. कळपच्या कळप दगावल्यावर हे निदान लागणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मंगळवार, दि. ९ रोजी आनंदा चोरमुले, दादासाहेब म्हमये व रघुनाथ ढोले यांच्या प्रत्येकी दोन, रामचंद्र ढोले व सचिन हजारे यांची प्रत्येकी एक आणि दादासाहेब सिध्द यांच्या तीन अशा ११ मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर तीन कळपातील १०० मेंढ्यांना नव्याने लागण झाली आहे. उपचाराअभावी मेंढ्या मृत्युमुखी पडत असल्याने मेंढपाळांनी आज (बुधवारी) सकाळी अकराच्या दरम्यान लागण झालेल्या मेंढ्या आष्टा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांच्या केबिनमध्ये सोडल्या. उपचाराबाबत डॉक्टरांना धारेवर धरले.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना भ्रमणध्वनीवरून याबाबतची कल्पना दिली. वरिष्ठांनी याला दाद दिली नाही. यामुळे मेंढपाळ चिडले होते. त्यांनी अधिकाऱ्यांचा निषेध केला. दरम्यान, मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मेंढ्यांच्या फुप्फुसावर फोड उठलेले दिसले. आत पाणी साचल्याने जंतुसंसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निदर्शनास आले. या देवी रोगामुळे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
आष्ट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. के. एस. डिसले म्हणाले, येथील दवाखान्यात देवी रोगाची लस उपलब्ध नाही. लक्षणावरून उपचार सुरू आहेत. शवविच्छेदनाचे नमुने पुणे येथे पाठविले आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच योग्य निदान करता येईल. (वार्ताहर)