मिरज ‘सिव्हिल’मध्ये ऑक्सिजन टँकला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:18+5:302021-06-03T04:19:18+5:30

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला बुधवारी रात्री अचानक गळती लागल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. ...

Leakage of oxygen tank in Miraj Civil | मिरज ‘सिव्हिल’मध्ये ऑक्सिजन टँकला गळती

मिरज ‘सिव्हिल’मध्ये ऑक्सिजन टँकला गळती

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला बुधवारी रात्री अचानक गळती लागल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. सहा हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकला गळती लागल्यामुळे पोलिस, महापालिका अग्निशमन दलासह जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ दुरुस्ती केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

ऑक्सिजन टँकची गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. या घटनेमुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले. मिरज सिव्हीलच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये सहा हजार लिटर क्षमतेचे तीन टँक असून या टँकमध्ये द्रवरूप ऑक्सिजन साठा करण्यात येतो. बुधवारी रात्री नऊ वाजता सहा हजार लिटर क्षमतेच्या एका टँकमधून ऑक्सिजन गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आल्याने सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. मात्र आणखी दोन टँक उपलब्ध असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सिव्हिल प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चाैधरी, पोलिस, महापालिका अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. टँकची गळती काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू होते.

चाैकट

रुग्णांचे नातेवाईक चिंतेत

मिरज ‘सिव्हिल’मध्ये सुमारे ३५० कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल असून यापैकी ८० व्हेंटिलेटर व २०० अतिदक्षता विभागातील ऑक्सिजन बेड आहेत. या सर्व रुग्णांसाठी ‘सिव्हिल’च्या ऑक्सिजन प्लांटमधून अखंड पुरवठा करण्यात येतो. गळतीमुळे किंवा अन्य कारणाने रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यास हाहाकार निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरज सिव्हिलमध्ये ऑक्सिजन गळतीच्या बातमीने रुग्णांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

Web Title: Leakage of oxygen tank in Miraj Civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.