पुढारीपणावरून मोहनशेठ-संजयकाकांमध्ये जुंपली

By Admin | Updated: April 17, 2015 00:03 IST2015-04-16T23:43:04+5:302015-04-17T00:03:58+5:30

शाब्दिक टोलेबाजी : काँग्रेस-भाजपमधील खेचाखेची कायम, सांगलीतील कार्यक्रमात संघर्षाचे दर्शन

From the leadership, Mohansheeth and Sanjayakak got involved in the issue | पुढारीपणावरून मोहनशेठ-संजयकाकांमध्ये जुंपली

पुढारीपणावरून मोहनशेठ-संजयकाकांमध्ये जुंपली

सांगली : सहकारातील दुरवस्थेवरून जिल्ह्यातील काँग्रेस-भाजपमधील टोलेबाजी गुरुवारीही सुरूच राहिली. मोहनराव कदम, पतंगराव कदम यांनी सहकाराची वाट लावली, अशा शब्दात जतचे भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी आठ दिवसांपूर्वी केलेल्या आरोपाचे पडसाद साखर कामगारांच्या मेळाव्यातही उमटले. या मेळाव्यात ‘काहीजणांना आयते पुढारीपण मिळाले आहे,’ असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी लगावताच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी, ‘आता राजकारणात नवी पिढी आली आहे, त्यांचे पाय मागे ओढू नका’, असा सल्ला दिला. अर्थात ही टोलेबाजी एकमेकांचे नाव न घेता झाली.
येथील वसंत कामगार भवनमध्ये साखर कामगारांचा मेळावा झाला. या मेळाव्यात मनोगतामध्ये मोहनराव कदम म्हणाले की, आपण एकेकाळी महिना तीस रुपये पगारावर कारखान्यात काम केले आहे. कामगारांची दुखणी मला माहीत आहेत. त्यामुळेच सहकारात मी काम करू शकलो. कामगारांना न्याय देऊ शकलो. काहीजणांना आयते पुढारीपण मिळते. त्यांनी कोणताही मतभेद न ठेवता कामगारांच्या हितासाठी काम करावे.
वस्तुत: हा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला होता. मात्र तो खा. पाटील यांना लागला असावा. तोच धागा पकडून खा. पाटील म्हणाले की, आता राजकारणात नवी पिढी आली आहे. मोदींची लाट आली आहे. अर्थात हा बदल लोकांनीच घडवून आणला आहे. सामान्य कार्यकर्ते व नव्या पिढीला नावे न ठेवता त्यांना बळ देण्याचे काम आता ज्येष्ठांनी केले पाहिजे. केवळ टीका करून प्रगती होणार नाही. झालेला बदल स्वीकारा.
आठ दिवसांपूर्वी आ. जगताप यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांच्यामुळेच जिल्ह्यातील सहकाराची वाट लागली असून, द्वेषापोटीच सहकारी कारखाने, बँका, बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करून चौकशीचा कट करण्यात आल्याची टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना मोहनराव कदम म्हणाले होते की, लबाड लोकांनी आमच्याबद्दल बोलू नये. कुबड्या घेऊन कधी मी राजकारण केले नाही. सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्तीवेळी सहकारमंत्री कोण होते, याचा अभ्यास संबंधितांनी करावा. त्यानंतरही जगताप आणि कदम गटात खेचाखेची कायम राहिली. गुरुवारच्या मेळाव्यातील खा. पाटील आणि मोहनराव कदम यांच्यातील शाब्दिक द्वंद्वाला जगताप-कदम यांच्यातील वादाचीच किनार होती. (प्रतिनिधी)

Web Title: From the leadership, Mohansheeth and Sanjayakak got involved in the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.