नेते कुठेही गेले, तरी शेवटी कॉँग्रेसच्याच दावणीला येणार
By Admin | Updated: July 27, 2015 00:30 IST2015-07-26T23:19:10+5:302015-07-27T00:30:35+5:30
पतंगराव कदम : मदन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

नेते कुठेही गेले, तरी शेवटी कॉँग्रेसच्याच दावणीला येणार
सांगली : पक्ष सोडून कोणी कुठेही गेले तरी, शेवटी त्यांना कॉँग्रेसच्या दावणीलाच यावे लागेल. आजवर किती आले आणि किती गेले तरी, कॉँग्रेस अभेद्य आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या त्यांनी मदन पाटील यांना टोला लगावला. मदन पाटील यांच्याविषयी ते म्हणाले, कोणी कुठे जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कॉँग्रेसला अनुभव नवा नाही. आजवर अनेकजण पक्षातून गेले, पण पुन्हा त्यांना कॉँग्रेसच्याच दावणीला यावे लागले. आम्हीही याकडे लक्ष देत नाही. बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही समविचारी लोकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढत आहोत. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, त्यात सांगलीच्या बाजार समितीचा समावेश होतो. त्यामुळे या बाजार समितीवर सत्ता प्रस्थापित करणे आमचे लक्ष्य असेल. आम्ही बाजार समितीचा कायापालट करू. महापालिकेप्रमाणेच बाजार समितीमध्येही आपण लक्ष घालणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही सरकारांचा कारभार चांगला नाही. लोकांमधून त्यांच्याविषयी नाराजी आहे. भलेही आमचे सरकार अधिक काळ सत्तेवर होते, पण त्यांनी वर्षभरात काही गोष्टी करण्याची आश्वासने जनतेला दिली होती, त्याचे काय? जनता त्यांना त्या गोष्टीचा हिशेब मागणारच आहे. साखर कारखानदारीबद्दलही शासनाची उदासीनता दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर, पुढील हंगामात कारखाने सुरू होतील की नाही, याची शंका आहे. (प्रतिनिधी)
बदलत्या समीकरणाची नांदी
बाजार समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात काही बदल झाले आहेत. हे जिल्ह्याच्या भविष्यातील बदलाची नांदी आहे, असे मत पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.
एकत्र यायला हवे
जिल्हास्तरावरील निवडणुकांमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येणे गरजेचे आहे, मात्र आजवर सांगली जिल्ह्यात अशा गोष्टी अपवादानेच घडल्या, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
ते नेत्यांचे पॅनेल
जयंतरावांच्या पॅनेल म्हणजे नेत्यांचे पॅनेल आहे. कार्यकर्त्यांना आम्ही महत्त्व देतो. त्यामुळे आमचे पॅनेल हे कार्यकर्त्यांचे पॅनेल आहे, अशी टीका पतंगरावांनी केली.
राणेंना आक्रमकता अपेक्षित
नारायण राणे यांनी काँग्रेसच्याबाबतीत व्यक्त केलेले मत त्यांचे व्यक्तिगत मत आहे. तरीही विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यापूर्वी आक्रमकतेने काम केले आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून अधिक आक्रमकता अपेक्षित आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.