नेतृत्व जयंत पाटील यांचे, मात्र, भूमिका विरोधाची!
By Admin | Updated: May 20, 2016 00:05 IST2016-05-19T23:08:40+5:302016-05-20T00:05:48+5:30
इस्लामपूर नगरपालिका : संजय कोरेंचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
नेतृत्व जयंत पाटील यांचे, मात्र, भूमिका विरोधाची!
अशोक पाटील -- इस्लामपूर -‘माझे नेते जयंतराव आहेत. त्यांनी मला उपनगराध्यक्षपदी संधी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. परंतु काही पदाधिकारी जनहिताची कामे करीत नाहीत. सभागृहात काही गोष्टी चुकीच्या होतात, त्याला माझा नेहमीच विरोध असतो, पण मी विरोधक नाही. चुकीला चूक म्हणणारा असल्याने, मला कोणाचीही भीती नाही. येथून पुढेही माझी भूमिका अशीच राहील’, असा घरचा आहेर उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
इस्लामपूर नगपालिकेतील सवत्या सुभ्याबाबत कोरे म्हणाले की, आमदार जयंत पाटील यांनी शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. या निधीचा योग्य वापर व्हावा. झालेल्या विकास कामांबद्दल जनतेतून समाधान व्यक्त व्हावे, असे कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळेच मला विरोधकाची भूमिका पार पाडावी लागते. सभागृहातील कामकाज पाहताना चुकीच्या मुद्यांवर माझे सत्ताधाऱ्यांशी मतभेद होतात. वैयक्तिक कोणाशीही माझे वैर नाही. त्यामुळे माझ्याबद्दल बोलणाऱ्यांचे तोंड मी धरू शकत नाही. जी मंडळी माझ्याबद्दल वाईट बोलतात, त्यांनी बोलत राहावे. त्यांचे मला काहीही देणे—घेणे नाही.
प्रशासनाकडून एखादे काम चुकीचे होत असेल, त्या कामाबद्दल खेद व्यक्त केला, म्हणजे मी जाणूनबुजून विरोध करतो असे नव्हे. त्याबद्दल कोण काय म्हणते यापेक्षा, चुकीच्या कामामुळे सत्ताधारी आणि पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून सभागृहात मत मांडत असतो. या मताला जर माझे हितचिंतक विरोधी मत म्हणत असतील, तर याचे मला दु:ख वाटते, असेही कोरे यांनी शेवटी स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष संजय कोरे आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. ते त्यांच्या पध्दतीने काम करत असतात. परंतु काही हितचिंतक त्याचा वेगळा अर्थ काढत आहेत. पालिकेच्या सभागृहात नेहमीच वाद होत असतात. याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत असा होत नाही. - सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष
एकदिलाने नांदत असल्याचे नाटक...
आगामी सर्वच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांतील अंतर्गत वादांवर आमदार जयंत पाटील यांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. ते स्वत: पालिकेच्या पक्षबैठकीस उपस्थित राहून प्रत्येक नगरसेवकाचे प्रगतीपुस्तक तपासत आहेत. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसानुसा चेहरा करून, आपण पालिकेत एकदिलाने नांदत असल्याचे भासवतात. मात्र उपनगराध्यक्ष कोरे यांना सत्ताधाऱ्यांतील काही हितचिंतकांनी कशी वागणूक दिली, याचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे.