एलबीटीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By Admin | Updated: April 2, 2015 00:39 IST2015-04-01T23:12:42+5:302015-04-02T00:39:42+5:30
विवेक कांबळे यांचा पुढाकार : सर्व महापालिकांच्या महापौरांना पत्र

एलबीटीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार
सांगली : महापालिका हद्दीतील एलबीटी एक आॅगस्टपासून रद्द झाल्यानंतर पालिकेची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येणार आहे. या प्रश्नावर राज्यातील सर्व महापालिकांचे महापौर, उपमहापौरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी महापौर विवेक कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौर व उपमहापौरांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.
राज्य शासनाने एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन अर्थसंकल्पात दिले आहे. एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांची गेल्या दोन वर्षात मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात एलबीटी रद्द झाल्यानंतर ही स्थिती आणखीनच बिकट होणार आहे. शासनाकडून एलबीटीपोटीचे अनुदान कोणत्या स्वरुपात मिळणार, व्हॅटवर सरचार्ज लागू होणार असला तरी, महापालिकेची रक्कम कधी मिळणार, याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे सर्वच महापालिकांत संभ्रमाचे वातावरण आहे.
यासंदर्भात महापौर विवेक कांबळे यांनी पुढाकार घेऊन एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांच्या महापौर व उपमहापौरांना पत्र पाठविले आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर महापालिकेचे दैनंदिन कामकाज व विकास कामांवर परिणाम होणार आहे. नागरी सुविधा ते कर्मचाऱ्यांचे वेतन, अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. काही व्यापारी संघटनांचे म्हणणे ऐकून राज्य शासन एकतर्फी निर्णय घेत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असलेल्या एलबीटीवरच शासनाकडून घाला घातला जात आहे. त्यात मुद्रांक शुल्कची रक्कम पालिकांना मिळण्यास विलंब होत आहे. एलबीटी हटवून व्हॅटचे अनुदान पालिकांना दिले जाईल, पण त्याचा कालावधी पाहता, पालिकेचा आर्थिक कणाच मोडून पडणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना निधीअभावी पूर्ण होऊ शकणार नाहीत.
त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सर्व समस्यांवर विचारविनियम केला जाणार आहे. पालिकांना अनुदानाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी व पालिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मागितली आहे. त्यांची वेळ मिळताच त्या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व महापौर व उपमहापौरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही विवेक कांबळे यांनी पत्राद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)