एलबीटीप्रश्नी आजपासून व्यापाऱ्यांचा एल्गार

By Admin | Updated: March 27, 2015 00:56 IST2015-03-27T00:56:50+5:302015-03-27T00:56:50+5:30

स्टेशन चौकात आंदोलन : सांगली ‘बंद’ची हाक; राज्यातील व्यापारीही सहभागी होणार

LBT Question Today Merchants Elgar | एलबीटीप्रश्नी आजपासून व्यापाऱ्यांचा एल्गार

एलबीटीप्रश्नी आजपासून व्यापाऱ्यांचा एल्गार

सांगली : राज्य शासनाकडून झालेली निराशा, महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी घेतलेला आक्रमक पवित्रा या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सांगलीतील व्यापाऱ्यांनी एलबीटीविरोधात निर्णायक आंदोलनाची हाक देत बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्य शासन व महापालिकेकडून ठोस हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यात महापालिकेनेही व्यापाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांना मैदानात उतरविले आहे. कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करीत महापौरांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे आता महापालिका व व्यापाऱ्यांतील संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दोन वर्षांपासून एलबीटीवरून सांगलीतील व्यापाऱ्यांनी आंदोलन हाती घेतले आहे. या कालावधित व्यापाऱ्यांकडे १७० कोटी रुपयांचा एलबीटी थकित असल्याचे सांगत प्रशासनाने वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून एलबीटी वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यातून व्यापारी विरुद्ध पदाधिकारी, प्रशासन असा नवा वाद निर्माण झाला आहे. एलबीटी न भरल्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पहिल्या वर्षी ५० कोटी, तर यंदा ७० कोटी रुपयांची एलबीटी वसूल झाली आहे. दरमहा पाच कोटी रुपयांचे उत्पन्न एलबीटीतून मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार देतानाही नाकीनऊ आले आहे.
गेल्या आठवड्याभरात महापौरांनी वसुलीची सूत्रे हाती घेतल्यापासून या संघर्षाला धार चढली आहे. त्यात राज्य शासनाने एक एप्रिलऐवजी एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत निराशा पसरली होती. व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्याची तयारी दर्शविली, पण त्यासाठी काही अटीही घातल्या. त्यात दंड व व्याज माफीची मागणी केली. पण हा निर्णय पालिकेच्या हाती नाही. त्यामुळे महापौरांसह आयुक्तांनीही, एलबीटी भरण्यास सुरुवात करा, मगच त्यावर चर्चा होईल, असा पवित्रा घेत व्यापाऱ्यांना फटकारले होते. राज्य शासनाकडून झालेली निराशा, पालिकेच्या कारवाईविरोधात गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचा निर्धार एलबीटी हटाव कृती समितीने केला आहे. गुरुवारी सांगली ‘बंद’ची हाक देण्यात आली असून, सकाळी गणपती मंदिरासमोर आरती करून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर स्टेशन चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: LBT Question Today Merchants Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.