एलबीटीत ५० लाखांची वाढ
By Admin | Updated: June 26, 2014 00:26 IST2014-06-26T00:24:33+5:302014-06-26T00:26:25+5:30
कर भरणाऱ्यांची संख्या घटली : गत महिन्याच्या तुलनेत चांगली कामगिरी

एलबीटीत ५० लाखांची वाढ
शीतल पाटील ल्ल सांगली
शासनस्तरावर एलबीटीच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम असतानाही सांगली महापालिकेची मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये ५० लाखांची जादा करवसुली झाली आहे. दुसरीकडे एलबीटी रद्द होणार, म्हणून कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
महापालिका क्षेत्रात २१ मे २०१३ पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी असहकार्य आंदोलन पुकारल्याने एलबीटीच्या वसुलीत अनेक अडचणी आल्या. जानेवारीपासून एलबीटीच्या वसुलीस प्रशासनाला सूर गवसला. महिन्याकाठी सहा ते सात कोटींच्या घरात उत्पन्न गेले. त्यामुळे पुढीलवर्षी एलबीटी जकातीपेक्षा अधिक होणार, अशी आशा प्रशासनाला लागली होती.
त्यातच शासनस्तरावर एलबीटी रद्दच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला. त्याचा फटका महापालिकेला बसला आहे. गेल्या दोन महिन्यांत एलबीटीची नव्याने एकही नोंदणी झालेली नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली. गेल्या महिन्यात तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पालिकेकडे पैसे नव्हते. कशीबशी वसुली करून कर्मचाऱ्यांचे वेतन भागविण्यात आले.
गेल्या आठवडाभरात एलबीटीविरोधात शासनस्तरावर विविध मतमतांतरे दिसून आली. एलबीटी रद्द होणार, असे वातावरण तयार झाले. त्याचाही परिणाम महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील आकड्यांवर नजर टाकली, तर एलबीटी भरणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्यात १८०२ जणांनी एलबीटीचा भरणा केला होता. तोच जूनमध्ये ११९१ जणांनी एलबीटी भरला आहे.
एकीकडे एलबीटीबाबत अनिश्चितता कायम असताना दुसरीकडे जून महिन्यात महापालिका कराच्या वसुलीत वाढ झाल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्यात महापालिकेला एलबीटीतून ४ कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तेच मे महिन्यात ४ कोटी २१ लाख व जून महिन्यात ४ कोटी ८९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल व मे महिन्याच्या तुलनेत ५० लाख रुपये जादा वसूल झाले आहेत. गेल्या तीन महिन्यात १३ कोटी ९१ लाख रुपयांचे उत्पन्न एलबीटीतून पालिकेला मिळाले आहे. (प्रतिनिधी)