एलबीटीची लाखोंची उड्डाणे
By Admin | Updated: October 1, 2015 22:46 IST2015-10-01T22:46:56+5:302015-10-01T22:46:56+5:30
दुसऱ्या दिवशी कारवाई : व्यापाऱ्यांकडून १२.७१ लाख वसूल

एलबीटीची लाखोंची उड्डाणे
सांगली : महापालिकेच्या एलबीटी विभागाने थकित कर वसुलीसाठी सलग दुसऱ्यादिवशी व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सांगलीतील दोन व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या व्यापाऱ्यांनी १२.७१ लाख रुपयांचे धनादेश एलबीटी विभागाकडे जमा केले. अजूनही ३० व्यापारी एलबीटी विभागाच्या रडारवर असून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त सुनील नाईक व एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन करीत बहिष्कार टाकला होता. गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांकडे १०४ कोटी रुपयांची एलबीटी थकित आहे. राज्य शासनाच्या अभय योजनेत बऱ्याच व्यापाऱ्यांनी भाग घेतला. अजूनही दीड हजार व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी केलेली नाही. तसेच दोन ते अडीच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी विभागाकडे विवरणपत्र सादर केलेले नाही. एलबीटी वसुलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वारंवार होत होता. अखेर प्रशासनाने बुधवारपासून थकित व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. बुधवारी तीन व्यापाऱ्यांकडून बारा लाख वसूल करण्यात आले होते. गुरुवारी आणखी दोन व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शंभर फुटी रस्त्यावरील साई मंदिरासमोरील वाय टू के फ्लेक्स या दुकानावर दुपारी महापालिकेचे पथक जप्तीसाठी दाखल झाले. या व्यापाऱ्याकडे नऊ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी होती. त्याने धनादेश देऊन कारवाई टाळली. टिंबर एरियातील राज एंटरप्रायझेस या व्यापाऱ्यावर तीन लाख रुपयांच्या थकबाकीपोटी कारवाई करण्यात आली. त्यानेही धनादेश दिले. महापालिकेने १५० व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्यापैकी ३५ जणांनी कर भरण्यास प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून अजून ३० व्यापारी रडारवर आहेत. शनिवारी मिरजेतील व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने दोन हजार व्यापाऱ्यांना विवरणपत्र सादर करण्याची नोटीस बजाविली आहे. त्याची मुदत आठवडाभरात संपणार असून त्यानंतर त्यांच्यावरही जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे नाईक व वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कटू प्रसंग टाळा ! कृती समितीने एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. अजूनही अनेकांनी कर भरणा, विवरणपत्र सादर केलेली नाहीत. त्यांनी महापालिकेचे अधिकारी आपल्या दारात येण्यापूर्वी एलबीटी कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी व महापालिका- व्यापाऱ्यांतील कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन कृती समितीचे समीर शहा यांनी केले आहे.