इस्लामपूर शहराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:38:14+5:302015-07-25T01:13:31+5:30
सत्ताधाऱ्यांचा डाव : विरोधकांत वेगवेगळे मतप्रवाह

इस्लामपूर शहराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात
अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर शहराचा नियोजित विकास आराखडा नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. सोयीस्कर विकास आराखडा करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आल्याचे समजते, तर विरोधी नेत्यांत विकास आराखड्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसते.
१९८0 नंतरच्या विकास आराखड्याला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. यापूर्वी नगरपालिकेने घोषित केलेला विकास आराखडा अन्यायकारक असल्याने तो रद्द केला गेला. त्यानंतर शासनाने नियुक्त केलेल्या समितीने नियोजित विकास आराखडा तयार करुन अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी पाठविला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते नियोजित विकास आराखडा जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील याबाबत म्हणाले की, हा विकास आराखडा नगरविकास खात्याकडून मंजूर होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी शहरातील काही रस्ते स्वत:च्या फायद्यासाठी कमी केले आहेत, तर काही रस्त्यांची रुंदी वाढवली आहे. उपजिल्हा रुग्णालयासमोरील भूखंडातील रस्ता रद्द करून हा भूखंड कासेगाव शिक्षण संस्थेसाठी आरक्षित केला आहे. त्याबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. कत्तलखाना, सार्वजनिक शौचालय व स्मशानभूमीसाठी सर्वसामान्यांच्या खासगी जागा अन्याय करुन घेतल्या आहेत. त्यावरील आरक्षण आपण रद्द करण्याच्या प्रयत्नात आहोत.
दुसरीकडे भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी यांनी, हा विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार म्हणाले की, आराखडा मंजूर होण्याअगोदरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. परंतु न्यायालयाने हा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतरच आपण न्यायालयात यावे, अशा सूचना केल्याने, आपण सध्या शांत आहोत.
विरोधी पक्षनेते विजय कुंभार म्हणाले की, हा विकास आराखडा अन्यायकारक आहे. सत्ताधाऱ्यांनी सभागृहात हा आराखडा बहुमताने मंजूर करून स्वत:चे भूखंड वाचविले आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे हा आराखडा मंजूर होण्याची शक्यता आहे.
इस्लामपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत. त्यांनी विकास आराखड्याविरोधात आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या आराखड्यासंदर्भात सर्व अभ्यास करूनच आपण निर्णय घेऊ. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. विरोधकांनी विकास आराखड्यापेक्षा शहरातील विविध विकास कामांसाठी त्यांच्याकडून निधी उपलब्ध करावा. त्यांच्यामते विकास आराखडा रद्द होणार असेल, तर ते मत त्यांना लखलाभ असो! आराखडा मंजुरीबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.
- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपालिका.