वसंतदादा’च्या संचालकांना शेवटची संधी
By Admin | Updated: November 9, 2016 00:52 IST2016-11-09T00:52:07+5:302016-11-09T00:52:07+5:30
‘बॅँक घोटाळा : २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी; आदेशानंतर कागदपत्रे ताब्यात

वसंतदादा’च्या संचालकांना शेवटची संधी
सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी माजी संचालक व अधिकाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याची शेवटची संधी दिली आहे. उपलब्ध कागदपत्रे ताब्यात घेऊन म्हणणे सादर न केल्यास संबंधितांचे काही म्हणणे नसल्याचे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाईल, असे रैनाक यांनी स्पष्ट केले आहे.
माजी संचालक व अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार जवळपास ११ हजार कागदपत्रे त्यांनी उपलब्ध करून दिली होती. तरीही बहुतांश संचालकांनी पैसे भरून कागदपत्रे ताब्यात घेतली नाहीत. मंगळवारी सुनावणीवेळी माजी संचालकांनी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करीत म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. रैनाक यांनी उपलब्ध कागदपत्रे ताब्यात घेण्याची सूचना दिली. २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी जे संचालक म्हणणे सादर करणार नाहीत, त्यांना याप्रकरणी काहीही म्हणायचे नाही, असे समजून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशानंतर दिवसभरात तीन माजी संचालकांनी पैसे भरून कागदपत्रे ताब्यात घेतली.
अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रावरील सुनावणीचे कामकाज सुरू असून, सुनावणीच्या सहा तारखा झाल्या आहेत. दरम्यान, माजी संचालकांनी याप्रकरणी सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. सहकार विभागाकडून याप्रकरणी सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही. तरीही अपिलाची एक प्रत सहकार विभागाकडून चौकशी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे. सहकार मंत्र्यांकडील अपिलावर होणाऱ्या सुनावणीकडे माजी संचालकांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी सहकार मंत्र्यांकडूनही दाद न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचीही तयारी माजी संचालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)