येडेनिपाणीत लसीकरणाला मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:32+5:302021-04-06T04:25:32+5:30
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) आयुर्वेदिक उपकेंद्रात २ एप्रिलपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्याच दिवशी २०० लोकांनी कोरोना प्रतिबंधक ...

येडेनिपाणीत लसीकरणाला मोठा प्रतिसाद
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) आयुर्वेदिक उपकेंद्रात २ एप्रिलपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्याच दिवशी २०० लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. सोमवारी ३९६ नागरिकांनी लस घेतली. आजअखेर १०३९ लोकांनी लस घेऊन वाळवा तालुक्यातील इतर गावांपुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कामेरीसारख्या मोठ्या गावासह इतर ५ गावांतील फक्त १९४६ नागरिकांनी १० मार्चपासून २६ दिवसांत लस घेतली आहे. संपूर्ण आरोग्य केंद्रातील ६ गावांत आजअखेर २९८५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
येडेनिपाणीत चार दिवसांत एक हजाराचा टप्पा पार करीत १०३९ लोकांचे लसीकरण पूर्ण केले. पहिल्याच दिवशीच ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वत: लस घेऊन सामान्य नागरिकांच्या मनातील लसीबाबतची भीती दूर केली. जनजागृतीसाठी गावातील लोकांचे प्रबोधन करून जनजागृती केली. ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ने-आण करण्यासाठी हौसेराव शेवाळे यांनी वाहन उपलब्ध करून दिले आहे. या सर्व बाबीमुळे लसीकरणाला गती मिळाली.
डॉ. साकेत पाटील, डॉ. नितीन चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ अंकोलीकर, आरोग्य सहायक व्ही. एस. कोरे व सर्व आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.