विटा : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खोटी माहिती देऊन मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची नोंदणी केल्याप्रकरणी पाडळी (ता. तासगाव) येथील कमल आनंदा पाटील या महिलेवर बुधवारी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विटा दुय्यम निबंधक पंकज वसंतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नोंदणी अधिनियम १९०८ मधील कलम ८२ अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे.पाडळी येथील संशयित कमल पाटील यांनी २ जानेवारी २०२३ आणि १५ डिसेंबर २०२३ या दिवशी विटा येथील निबंधक कार्यालयात रजिस्टर साठेखत दस्त क्रमांक ११/२०२३, तसेच रजिस्टर खूषखरेदीपत्र दस्त क्रमांक ४९१७/२०२३ नोंदणी केली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती लपविली. या दस्तावेजांत मालमत्तेच्या रेकॉर्डसंबंधी जुना रि.स.न. ८३८/१/१ व नवीन रि.स.न. ४५०/१/१ बद्दल खोटे निवेदन केले. साठेखत करताना दि. ६ जून २००३ रोजीचे गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र असूनही ते नसल्याचे दाखविण्यात आले. तसेच खूषखरेदीपत्राला विटा तहसील कार्यालयात योग्यरीतीने नोंद न झालेली बिनशेतीची खोटी नोटीस जोडण्यात आली. या खोट्या माहितीच्या आधारे व्यवहाराची नोंदणी करून फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही फसवणूक दि. २ जानेवारी २०२३ आणि १५ डिसेंबर २०२३ या दिवशी विटा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. याप्रकरणी पाडळी (ता. तासगाव) येथील संशयित कमल आनंदा पाटील या महिलेविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Sangli: विट्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे खूषखरेदीपत्र, पाडळीच्या महिलेविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:07 IST