गणपती पंचायतन संस्थानची जमीन लाटली
By Admin | Updated: May 28, 2014 00:50 IST2014-05-28T00:50:05+5:302014-05-28T00:50:20+5:30
सांगलीतील घटना : माधवनगरच्या व्यापार्यास पोलिसांकडून अटक

गणपती पंचायतन संस्थानची जमीन लाटली
सांगली : येथील गणपती पंचायतन संस्थानची रतनशीनगरमधील शासकीय विश्रामगृहाजवळील एक एकर २१ गुंठे जमीन लाटून त्यामध्ये प्लॉट पाडून त्यांची विक्री केल्याचा व संस्थानची ३५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी श्रीनिवास जयनारायण बजाज (वय ६०, रा. माधवनगर) या व्यापार्यास अटक केली आहे. यासंदर्भात संस्थानचे व्यवस्थापक बालकिसन जाजू यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादित म्हटले आहे की, बजाज यांनी, गणपतीचे परमभक्त असल्याचे सांगून विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याशी जवळीक साधली. संस्थानची विश्रामगृहाजवळ सर्व्हे क्रमांक ११६ मध्ये सहा एकर ३८ गुंठे जमीन आहे. त्यापैकी पाच एकर १८ गुंठे विजयसिंहराजे यांनी ९ मार्च २००१ रोजी त्यावेळचे मुखत्यार किशोर वसनजी यांच्याकडून सोल मॅनेजिंग ट्रस्टीचा मुखत्यार अधिकारात डेव्हलपमेंट अग्रीमेंट बजाज यांनी स्वत:च्या नावावर करुन घेतले आहे. यासंदर्भात विजयसिंहराजेंनी प्रशासकीय मंजुरीसाठी बजाजला १६ मार्च २००१ रोजी स्वतंत्र मुखत्यारपत्र करुन दिले होते. उर्वरित एक एकर २१ गुंठे जमीन संस्थानने स्वत:साठी राखून ठेवली होती. बजाजने या जागेचा बनावट आराखडा तयार करुन तो बिनशेती प्रकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेच्या नगररचना विभागात मंजुरीसाठी पाठविला. या आराखड्यास मंजुरीही मिळाली. (प्रतिनिधी)