सांगली : शहरातील जुन्या बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवासमधील घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने २३ हजार ८०० रुपयांचे संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम व दागिने असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी राजश्री साहेबलाल गवंडी (रा. बिल्डींग नं. ३९, वाल्मिकी आवास, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सध्या सांगलीत असलेल्या पूरस्थितीमुळे अनेकजण घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. गवंडी याही घर बंद करुन दि. २४ ते २७ जुलै या कालावधीत अन्य ठिकाणी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्याने त्यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत साहित्य लंपास केले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर गवंडी या घरी परत आल्या असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.