बिऊरला तीन तोळे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:32+5:302021-05-30T04:22:32+5:30
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथे बंद घरातील कुलूप काढून तिजोरीतील तीन तोळ्याचे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ...

बिऊरला तीन तोळे दागिने लंपास
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथे बंद घरातील कुलूप काढून तिजोरीतील तीन तोळ्याचे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
बिऊर येथील मुख्य रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागील बाजूस अक्षय वसंत पाटील राहतात. घर बंद करून कुलपाची चावी तेथेच दिवळीत व घरातील तिजोरीची चावी ठराविक ठिकाणी साडीच्या घडीत ठेवण्याची त्यांना सवय आहे.
सकाळी साडेनऊच्या दरम्यान घर बंद करून अक्षय यांच्या आई रानात गेल्या, तर अक्षय नोकरीच्या ठिकाणी गेला. सवयीप्रमाणे त्यांनी कुलपाची चावी दिवळीत ठेवली. त्यानंतर अक्षय यांचा चुलत भाऊ साहिल पाटील याने अक्षय पाटील यांचे घर बराचवेळ उघडे असल्याचे पाहिले. यावेळी कपाटही उघडे असल्याचे दिसले. मात्र, घरात कोणीही दिसत नसल्याने त्याने अक्षय यांना फोन करून कळविले.
त्यानंतर अक्षय व त्यांच्या आई घरी आले असता किल्ली घेऊन तिजोरी उघडून चोरट्याने त्यातील मोहनमाळ, चेन, कानातील रिंगा, अंगठी आदी ७२ हजार रुपयांचे तीन तोळ्याचे दागिने पळविल्याचे लक्षात आले.
याबाबत अक्षय पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून, तपास हवालदार कालिदास गावडे करीत आहेत.
चौकट
अक्षय यांच्या घराची व तिजोरीची चावी ठेवण्याचे ठिकाण माहिती असणाऱ्या माहितीतील व्यक्तीने ही चोरी केली असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी भेट दिली.