तीन लाखांचे साहित्य लंपास
By Admin | Updated: March 29, 2015 00:43 IST2015-03-29T00:39:18+5:302015-03-29T00:43:02+5:30
सांगलीतील घटना : आमराई क्लबमध्ये रखवालदाराचे कृत्य

तीन लाखांचे साहित्य लंपास
सांगली : येथील आमराई क्लबचे तीन लाखांचे प्लंबिंग साहित्य घेऊन रखवालदाराने पलायन केल्याचा प्रकार काल, शुक्रवारी रात्री उघडकीस आला. शिवराम अण्णाप्पा गेजगे (रा. जाडरबोबलाद, ता. जत) असे या रखवालदाराचे नाव आहे. २१ व २२ मार्चला या साहित्याची चोरी झाली आहे. तेव्हापासून गेजगे गायब असल्याने क्लबमधील पर्यवेक्षक राजेंद्र भानुदास काळे (रा. दत्तवाडे प्लॉट, मिरज) यांनी त्याच्यावर संशय घेऊन शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
आमराई क्लबचे गेल्या काही महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर शिवराम गेजगे रखवालदार होता. त्याला तेथील साहित्यावर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्यानेच साहित्यावर डल्ला मारला. प्लंबिंग कामासाठी आणलेल्या महागड्या वस्तू त्याने पळविल्या. यामध्ये पाईप, शॉवर, कॉक, मिस्कर, शॉवर बॉडी, नळ, वॉश बेसिन नळ आदी साहित्यांचा समावेश आहे. २१ व २२ मार्चला तो रात्रपाळीवर होता. त्यावेळी त्याने तीन लाखांचे साहित्य पळविले. २३ मार्चला तो कामावर आला नाही.
या काळात प्लंबिंगचे काम करण्यासाठी प्लंबर आला होता. त्याला साहित्य काढून देण्यासाठी कर्मचारी गेले. तथापि साहित्य नव्हते. हा प्रकार पाहून व्यवस्थापनाला धक्का बसला. साहित्य चोरीला गेल्याचा संशय आला. व्यवस्थापन व तसेच पर्यवेक्षक राजेंद्र काळे यांनी गेजगे याच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण त्याचा मोबाईल बंद होता. त्यानेच चोरी केल्याची खात्री पटल्याने शुक्रवारी रात्री काळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार गेजगेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कामटे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)