‘लाजमहाल’ अनुदानासाठी सोडली लाज!

By Admin | Updated: April 16, 2015 00:06 IST2015-04-15T23:26:33+5:302015-04-16T00:06:12+5:30

फुकट्यांची धावपळ : भामट्यांकडून अनेकांची फसवणूक, अधिकाऱ्यांपुढे डोकेदुखी

Lajmahal left for subsidy! | ‘लाजमहाल’ अनुदानासाठी सोडली लाज!

‘लाजमहाल’ अनुदानासाठी सोडली लाज!

अविनाश बाड - आटपाडी -शहाजहानने आपल्या प्रिय पत्नीसाठी बांधला ताजमहाल, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी निदान एक लाजमहाल (शौचालय) तरी बांधा! असे आवाहन सध्या प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र हा ‘लाजमहाल’ बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या १२ हजार रुपयांच्या अनुदानासाठी अनेक फुकटे लाज सोडून धावपळ करताना दिसत आहेत. जुन्याच शौचालयाचे छायाचित्र काढून, आताच बांधले आहे म्हणून अनेक टग्यांनी अधिकाऱ्यांना अगदी भंडावून सोडल्याचे धक्कादायक चित्र आहे.
आटपाडी तालुका शौचालयांच्या बाबतीतही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मागे आहे. जनजागृतीबरोबर इथे वारंवार येणारी दुष्काळी परिस्थिती ही याचे मोठे कारण आहे. आजही तालुक्यातील एकाही गावात वर्षभरात कधीही दररोज पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. सतत पाणीटंचाईला सामोऱ्या जाणाऱ्या या तालुक्यात आजही सुमारे ४० हजाराहून अधिक संख्येने लोक दरवर्षी जगण्यासाठी स्थलांतर करतात. अशा परिस्थितीत केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खोटी आकडेवारी फुगविल्याने प्रशासनाची वारंवार पंचाईत होताना दिसते. मग ग्रामपंचायतीचा कारभारी होण्यासाठी जर शौचालयाचा दाखला सक्तीचा लागत असेल, तर एका दिवसात कसेबसे छायाचित्रापुरते शौचालय उभे करणाऱ्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पुढाऱ्यांची इथे कमतरता नाही.
सध्या शेतकरी-शेतमजूरच काय, अनेक नोकरवर्गाकडेही गावातील घरामध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. तालुक्यात जी अनेक सार्वजनिक शौचालये बांधली आहेत, त्यामध्येही प्रचंड बोगसगिरी असल्याची कायम चर्चा असते. खेड्यापाड्यातील अशा अनेक शौचालयांसाठी खड्डेच खणलेले नाहीत. फक्त जमिनीवर फूट-अर्धा फूट खाली खड्डा असून, तो बांधून घेतल्याच्या अनेक उदाहरणांच्या सुरस कहाण्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायत परिसरात ऐकायला मिळतात. त्यामुळे केवळ उद्दिष्ट (कागदोपत्री) साध्य होते, लोकांना त्याचा काहीच लाभ होताना दिसून येत नाही. नाही म्हणायला फक्त बांधकाम विभागाचे अभियंते आणि ठेकेदार यांचे खिसे फक्त फुगतात. बरं, ही कामेही अलीकडे गावोगावचे पुढारीच करीत आहेत. त्यामुळे हे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरत आहेत.
यापूर्वी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ४,६०० रुपयांचे अनुदान मिळत होते. यामध्ये केंद्र शासनाकडून ३२०० आणि राज्य शासन १२०० रुपये देत होते. आता या अनुदानात वाढ करण्यात आली असून १२ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. अनुदानात वाढ केलेली असली तरी, निव्वळ एवढ्या अनुदानाच्या रकमेत शौचालय बांधून पूर्ण होत नाही. तरीही प्रोत्साहन म्हणून वैयक्तिक शौचालय ज्या कुटुंबांनी अजून बांधलेले नाही, त्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे शौचालय अनुदानामध्ये वाढ होणे अपेक्षित असताना, या योजनेच्या अनुदानावरच डल्ला मारण्यासाठी सराईत बहाद्दर सरसावले आहेत. जुन्या शौचालयाचे छायाचित्र जोडून अर्ज भरुन अनुदानाची मागणी करत आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव आणताना दिसत आहेत. पण त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहण्याचा धोका आहे.


आटपाडी तालुक्यातील वैयक्तिक शौचालयांचे २०१२ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. ती यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यावेळी ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नव्हते, त्यांनी आता शौचालय बांधले, तरच त्यांना अनुदान देण्यात येईल. याचा शौचालय नसणाऱ्या कुटुंबांनी लाभ घ्यावा. कारण गर्दीत खोटा पैसा चालविण्याचा अनेकजण प्रयत्न करीत आहेत, हे मात्र खरे.
- मधुकर देशमुख, गटविकास अधिकारी, आटपाडी



५‘कानाला मोबाईल, फिरायला गाडी, बायकोला मात्र उघड्यावर धाडी! जरा विचार कर मर्दा!’ असे भित्तीपत्रकातून आवाहन करणाऱ्या प्रशासनावर काही फुकट्यांनी आता विचार करण्याची वेळ आणली आहे. पंचायत समितीतून अनुदान मागणीसाठी अर्ज आणून अनेक गावात ‘तुम्हाला १२ हजार या अर्जामुळे मिळणार आहेत’, असे म्हणून हे अर्ज शेकडो रुपये घेऊन काहीजण विकत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या अनुदानाचा उपयोग होऊन शौचालययुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात कधी साकार होणार? हा प्रश्नच आहे. शौचालय निर्मितीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाने गावपातळीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अशा भामट्यांकडून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

Web Title: Lajmahal left for subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.