पोलीस वसाहतींमध्ये सुविधांची वानवा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:47+5:302021-02-06T04:46:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. वसाहतीमध्ये राहत असलेल्या ...

पोलीस वसाहतींमध्ये सुविधांची वानवा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. वसाहतीमध्ये राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, मोडकळीस आलेल्या इमारती व त्यात कामाचा ताण असल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबीयांकडेही लक्ष देता येत नसल्याचे चित्र आहे. या वर्षभरात पोलीस वसाहतींचे नूतनीकरण करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
जिल्ह्यात २६ पोलीस ठाणी कार्यरत असून त्यासह इतर कक्षाचेही कामकाज चालत असते. सांगली शहरात खणभाग परिसरात व विश्रामबागला पोलीस वसाहत आहे. दाेन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरावेळी पोलीस बंदोबस्तावर व त्यांच्याच घरात पाणी अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी वसाहत सोडून बाहेर राहणे पसंत केले होते.
पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा, इतर लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने यंदा काही अभिनव उपक्रम राबविले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना नियमित बंदोबस्तावरच रहावे लागत असल्याने अनेक अडचणीही येत आहेत. विशेषत: मुलांचे शिक्षण, कौटुंबीक अडचणीसह स्वत:च्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.
चौकट
पोलिसांना आठ तासांची ड्युटी
प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार आठ तासांची ड्युटी असलीतरी बंदोबस्तासाठी बाहेर असलेल्या व तपासाच्या अनुषंगाने बाहेर असल्याने अनेकदा नियमित वेळेपेक्षा जादा वेळेसाठी कर्मचाऱ्यांना बाहेर रहावे लागते. त्यातही तपासासह अचानक काही दुर्घटना घडल्यास पोलिसांवर अधिक ताण पडलेला असतो.
चौकट
कुटुंबाकडे लक्ष देण्यात कसोटीच
सदैव कामावर असलेल्या पोलिसांना कामाच्या वेळा व एकदा घरातून बाहेर पडले की नंतर कधी येता येईल याचा कुठलाही अंदाज नसल्याने पोलिसांना कुुटुंबाकडे लक्ष देताना कसोटीचा क्षण अनुभवावा लागत आहे.
चौकट
स्वत:च्या घराचे स्वप्न कायमच
पोलीस वसाहतीमध्ये काही पोलिसांची सोय होत असलीतरी पोलिसांना स्वत:चे घर असावे हे स्वप्न कायमच आहे. त्यामुळे शहरात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने शहरालगत छोटे प्लॉट घेत आपल्या घराचे स्वप्न सत्यात उतरविले आहे.
कोट
पोलिसांवर असलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या सूचनेनुसार त्यांना सुविधा देण्यात येत असून वसाहतींचे प्रश्नही लवकरच सोडविले जाणार आहेत.
मनीषा दुबुले, अप्पर पोलीस अधीक्षक
चाैकट
जिल्ह्यातील पोलीस संख्या २६००
पोलीस वसाहतींची संख्या २८.