सोनपरी डॉल ते लकी ड्रॉचा भूलभुलय्या
By Admin | Updated: May 22, 2015 00:11 IST2015-05-21T23:27:10+5:302015-05-22T00:11:01+5:30
आष्टावासीयांची लाखोंची फसवणूक : नागरिकांच्या प्रबोधनाची गरज

सोनपरी डॉल ते लकी ड्रॉचा भूलभुलय्या
सुरेंद्र शिराळकर - आष्टा -आष्टा शहरात काही वर्षांपूर्वी सोनपरी डॉलने धुमाकूळ घातला होता. यामध्ये लाखो रुपये बुडूनसुध्दा आष्ट्यातील जनतेला अनेक लोक फसवित आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण फसले जात आहोत, हे माहीत असतानाही अनेक लोक या योजनेमध्ये पैसे गुंतवून फसत आहेत. हा सिलसिला सुरूच राहणार का? अशा फसवणुकीचा ब्रेक लागणार, याची शहरात चर्चा आहे.
आष्टा या निमशहरी गावात काही वर्षांपूर्वी सोनपरी डॉल नावाची योजना जोरात सुरू होती. ठराविक रक्कम भरायची. त्या बदल्यात बाहुल्या तयार करून द्यायच्या, अशी योजना होती. यामध्ये अनेकांनी लाखो रुपये भरले होते. त्या बदल्यात सुरुवातीस बाहुल्या तयार करून देण्यात येत होत्या, मात्र सदस्य वाढल्यानंतर बाहुल्या तयार न करताच त्यांना घरबसल्या आठ दिवसात पैसे मिळू लागल्याने अनेकांनी यात पैसे गुंतविले. प्रत्यक्षात ठराविक बाहुल्याच मोडून पुन्हा पुन्हा तयार करण्यात येत होत्या.आष्ट्यातून एकही बाहुली विक्रीसाठी गेली नाही. पोलिसांनी कारवाईचा फार्स केला. हजारो लोकांचे लाखो रुपये पाण्यात
गेले.
याचप्रमाणे अनेक साखळी योजना आष्ट्यात आल्या. त्यांनी लाखो रुपये मिळवले व परागंदा झाले. याचप्रमाणे आष्टा येथील शिंदे चौकात प्रवीण दीपक आडसूळ याने मृत्युंजय मार्केटिंग ही योजना आणली. लकी ड्रॉच्या माध्यमातून ३५०० सभासदांकडून प्रत्येकी २५०० रुपये गोळा केले. यातील सभासदांना प्रत्येक रविवारी लकी ड्रॉ सोडत काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात होत होती. मात्र सुमारे ८७ लाखांच्या दरम्यान रक्कम जमा करून त्यातील काही रकमेच्या निकृष्ट वस्तू घेऊन त्या प्रत्येक सोडतीला देण्यात आल्या.
या लकी ड्रॉमध्ये काहींना मोटार, मोटारसायकलुाह मोठ्या किंमतीच्या वस्तू केवळ २५०० रुपयात मिळाल्या. मात्र इतरांना निकृष्ट दर्जाच्या वस्तू देऊन फसविल्याने पाच सभासदांनी प्रवीण आडसूळविरोधात आष्टा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
या घटनेत ८७ लाख जमा करून निम्म्या रकमेच्या वस्तू देऊन तीन महिन्यात लाखो रुपये मिळविणाऱ्यांना सजा होणार का, याकडे आष्टेकरांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही कमी दरात वस्तू किंवा कमी गुंतवणुकीत भरपूर पैशाच्या आमिषाला बळी न पडता जागरूक राहण्याची गरज आहे.+
कारवाई होणार का?
आष्ट्यात छोट्या-मोठ्या गुंतवणूक योजना आल्या. चालकांनी दुप्पट पैशाचे आमिष दाखवून हजारोंना फसविले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद होतो. परंतु पुढे काहीच होत नाही. मृत्युंजय मार्केटिंगचा अध्यक्ष प्रवीण आडसूळविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद असला तरी, हा केवळ पोलिसी कारवाईचा स्टंट होणार की दोषींना खरोखरच सजा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.