व्यापारी प्रभागात पुन्हा एल. एन. शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:17+5:302020-12-14T04:38:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील प्रभाग नऊ हा व्यापारी वर्गात मोडतो. यामध्ये मार्केट यार्ड, यल्लम्मा चौक, गांधी चौक ...

व्यापारी प्रभागात पुन्हा एल. एन. शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील प्रभाग नऊ हा व्यापारी वर्गात मोडतो. यामध्ये मार्केट यार्ड, यल्लम्मा चौक, गांधी चौक हा परिसर येतो. गत निवडणुकीत हा प्रभाग मोठा असल्याने एल. एन. शहा यांनी राजकारणाला तात्पुरता पूर्णविराम दिला. आता आगामी निवडणुकीत पुन्हा स्वत: आणि त्यांचे पुत्र उमेश शहा हे दोघेही दोन प्रभाग लढविण्याच्या तयारीत आहेत.
१९८६ च्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष अशोकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एल. एन. शहा यांनी पालिका निवडणूक लढविली. त्यांनी एकूण तीन निवडणुका लढविल्या. त्यापैकी दोन जिंकल्या, तर त्यांच्या पत्नी लताबाई शहा यांनी नगरसेविकेचा मान पटकाविला होता. नागरिक संघटनेचे नेतृत्व विजयभाऊ पाटील करीत होते. या संघटनेतही अशोकदादा पाटील होते. परंतु यांच्यात फूट पडल्याने अशोकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी स्थापन झाली. तेव्हापासून एल. एन. शहा हे राष्ट्रवादीविरोधी विकास आघाडीत कार्यरत आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात भाजप, शिवसेना आणि विविध संघटना एकत्रित येऊन विकास आघाडी स्थापन करण्यात आली. प्रभाग नऊमधून स्वत: एल. एन. शहा यांनी माघार घेऊन वैभव पवार यांना संधी दिली. आगामी पालिका निवडणुकीत प्रभाग नऊचे दोन प्रभाग पडतील. त्यामुळे एल. एन. शहा हे दोन प्रभाग लढविणार आहेत.
चौकट
राष्ट्रवादीला आव्हान
प्रभाग नऊ हा राष्ट्रवादीविरोधी मानला जातो. या प्रभागातून विकास आघाडीतून विद्यमान नगरसेवक वैभव पवार आणि अमित ओसवाल हे इच्छुक आहेत. आता एल. एन. शहा आणि त्यांचे पुत्र उमेश शहा हेही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीला मोठे आव्हान आहे.
कोट
सध्या शहराची परिस्थिती पाहता, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही. रस्ते, स्वच्छता आणि विकास कामांचा दर्जा पाहता शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत आरक्षणाचे नियोजन पाहून आपण दोन प्रभाग लढविणार आहोत.
- एल. एन. शहा, माजी नगरसेवक
फोटो - १३१२२०२०-आयएसएलएम-एल. एन. शहा