कुपवाडचा मंडल अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:03+5:302021-09-04T04:31:03+5:30
सांगली : जमिनीसंदर्भातील तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपयांची मागणी करत त्यापैकी २५ हजार रुपये लाच ...

कुपवाडचा मंडल अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
सांगली : जमिनीसंदर्भातील तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपयांची मागणी करत त्यापैकी २५ हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. संगणक ऑपरेटरकरवी ही लाच घेण्यात येत होती. याप्रकरणी कुपवाडचा मंडल अधिकारी श्रीशैल ऊर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६, रा. शिवाजीनगर, मालगाव, ता. मिरज) आणि संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार (वय ३६, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई केली.
तक्रारदाराची आई वारसदार असलेल्या जमिनीसंदर्भातील सुनावणी मंडल अधिकारी घुळी याच्यासमोर सुरू आहे. या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मंडल अधिकारी घुळी व त्याच्या कार्यालयातील संगणक ऑपरेटर जमादार यांनी ७० हजार रुपये लाचेची मागणी केली हाेती. लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने २८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आपला तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांकडून याची पडताळणी सुरू होती. यात ७० हजारांची मागणी करून त्यापैकी २५ हजार देण्यास सांगून उर्वरित ४५ हजार रुपये निकाल लागल्यानंतर देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या पथकाने राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात सापळा लावला. यात संगणक ऑपरेटर जमादार याने लाचेची मागणी करत २५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर त्यास पकडण्यात आले. तर घुळी याच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात आल्यानेही त्यासही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदत्त मोरे, अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रीतम चौगुले, राधिका माने, वीणा जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट
‘अतिरिक्त’ असतानाही कारभार
लाच घेताना कारवाई झालेला घुळी याची नियमित नेमणूक मिरज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अव्वल कारकुन म्हणून आहे, तर कुपवाडच्या मंडल अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अतिरिक्त कार्यभार असतानाही घुळी याने हा कारभार केला.