कुपवाडला अंत्यविधी साहित्यात गोलमाल
By Admin | Updated: September 1, 2015 22:32 IST2015-09-01T22:32:37+5:302015-09-01T22:32:37+5:30
चौकशीचे आदेश : शिवसेनेचे महापालिकेच्या सहायक आयुक्तांना निवेदन

कुपवाडला अंत्यविधी साहित्यात गोलमाल
कुपवाड : येथील स्मशानभूमीतील अंत्यविधी साहित्य पुरवठ्यामध्ये गोलमाल झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. माहिती अधिकारात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची महापौर विवेक कांबळे यांनीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने दिलेल्या ठेक्यानुसार हिंदूंसाठी तीनशे किलो लाकूड, चार मीटर कापड, तीन लिटर रॉकेलसह काठ्या, मडकी आदी साहित्य ठेकेदाराने पुरवायचे आहे. लिंगायत समाजासाठी मोठा खड्डा खोदून देणे, कापड, वीस किलो मीठ व अन्य पूजेचे साहित्य पुरविणे आवश्यक आहे. ख्रिश्चन समाजासाठी एक खड्डा खोदून देणे व हार-फुले देणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजासाठी बारा मीटर कापड, तीन फरशा, खड्डा खोदून देणे, विधीचे साहित्य देणे बंधनकारक आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील यांनी माहिती अधिकाराखाली एकत्रित केलेल्या माहितीनुसार प्रभाग तीनमध्ये २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये ५७० लोकांना अंत्यविधीचे साहित्य ठेकेदाराकडून पुरविण्यात आले आहे. हिंदूंना लाकडाव्यतिरिक्त अन्य वस्तू दिल्या जात नाहीत. परंतू, त्याची बिले महापालिकेकडून ठेकेदाराला दिली जातात. ठेक्यात नमूद असलेले साहित्य पुरविले जात नाही. हे साहित्य नातेवाईकांना स्वखर्चाने खरेदी करावे लागते.
अत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनीही याबाबत माहिती नसते. त्यामुळे ते दिलेले साहित्यतच घेऊन जातात. हिंदुना लाकडा व्यतिरिक्त काहीही दिले जात नाही. इतर सामाजाच्याही अत्यविधीसाठी दिल्या जाणाऱ्या साहित्यात कपात केली जाते. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर शिवसेनेने माहिती अधिकाराखाली याबाबत अर्ज केला होता. यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानंतर याबाबत तक्रारी करण्यात आल्या.
याबाबत तक्रार आल्यानंतर महापौर विवेक कांबळे यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सोमवारी सहायक आयुक्तांना शिवसेनेने कारवाईचे निवेदन दिले. यावेळी शहरप्रमुख अमोल पाटील, उपशहरप्रमुख सूरज कासलीकर, तानाजी जाधव, विजय गडदे, अभिजित राणे, केतन यादव यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
काळ्या यादीत टाकण्याचा इशारा