कुपवाडमध्ये पुर्ववैमनस्यातून तीन जणांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST2021-04-05T04:24:19+5:302021-04-05T04:24:19+5:30
कुपवाड : शहरातील शिवाजी ज्ञानू जानकर (वय ५४, रा. ओम गणेश पार्क, कापसे प्लाॅट, कुपवाड) यांच्यासह त्यांचा मुलगा, पत्नी ...

कुपवाडमध्ये पुर्ववैमनस्यातून तीन जणांना बेदम मारहाण
कुपवाड : शहरातील शिवाजी ज्ञानू जानकर (वय ५४, रा. ओम गणेश पार्क, कापसे प्लाॅट, कुपवाड) यांच्यासह त्यांचा मुलगा, पत्नी या तिघांना पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून सात जणांनी बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितामध्ये संजय लक्ष्मण जानकर, विपुल संजय जानकर, राहुल विष्णू इमडे यासह अनोळखी चार जण अशा सात जणाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. २) रात्री शिवाजी जानकर यांनी सोसायटी चौकात रिक्षा का थांबविली नाही, याचा जाब विचारायला संशयित संजय जानकर हा त्यांच्या घरी गेला होता. यावेळी दोघांत वादावादी झाली होती. याचा मनात राग धरून संजय जानकर हा तेथून निघून गेला. थोड्या वेळाने संजय हा विपुल, राहुल यासह अन्य चार जणांना मोटारसायकलवरून शिवाजी यांच्या घरी आला. या सात जणांनी शिवाजीच्या घरात घुसून शिवाजी व त्याचा मुलगा अक्षय, पत्नी आशा यांना लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले. संशयितांनी जानकर यांच्या घरातील साहित्य व संसारोपयोगी साहित्यांची तोडफोड करून आर्थिक नुकसान केले आहे. या घटनेची माहिती मिळताच व शेजारी जमा होताच संशयितांनी धूम ठोकली. शेजारी व काही नातेवाइकांनी जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत झाली असून पोलिसांनी सात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.