कुपवाडमध्ये रणरागिणींनी बुजविला एमआयडीसी रस्त्यावरील खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:53+5:302021-07-29T04:26:53+5:30

फोटो ओळ : कुपवाडमध्ये मुख्य एमआयडीसी रस्त्यावर पडलेला खड्डा नवचेतना महिला मंडळाच्या रणरागिणींनी बुजविला. लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : ...

In Kupwad, Ranaraginis dug a pit on MIDC road | कुपवाडमध्ये रणरागिणींनी बुजविला एमआयडीसी रस्त्यावरील खड्डा

कुपवाडमध्ये रणरागिणींनी बुजविला एमआयडीसी रस्त्यावरील खड्डा

फोटो ओळ : कुपवाडमध्ये मुख्य एमआयडीसी रस्त्यावर पडलेला खड्डा नवचेतना महिला मंडळाच्या रणरागिणींनी बुजविला.

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शहरातील मुख्य एमआयडीसी रस्त्यावरील महापालिका कार्यालयानजीक बसस्थानकासमोर अपघाताला कारणीभूत ठरणारा खड्डा बुधवारी दुपारी नवचेतना महिला मंडळाच्या रणरागिणींनी बुजविला. महापालिका प्रशासनाला कळवूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत होते. महिला मंडळाच्या या कृतीचे शहरातून कौतुक केले जात आहे.

एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर महापालिकेच्या कार्यालयासमोरील बसस्थानकासमोर गेल्या काही महिन्यांपासून हा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. हा खड्डा बुजवावा, असे निवेदन विविध संघटना, नागरिक, महिला मंडळांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. महापालिका प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखवीत दुर्लक्ष केले होते. पावसाळ्यात वाहनचालकांना या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नाही. तसेच खड्ड्यासमोर विजेचा खांब असल्याने रोज लहान-मोठे अपघात होत आहेत.

विशेष म्हणजे महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक व कर्मचारी या खड्ड्यामधूनच कार्यालयात ये-जा करीत असतात. त्यांच्या डोळ्यांना खड्डा दिसत नसल्याने व प्रशासन हा खड्डा बुजवीत नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे शहरातील नवचेतना महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा उपाध्ये यांच्या यांच्यासह सीमा पाटील, सुजाता कवठेकर, अंजू दीक्षित, माधुरी उपाध्ये, स्वरूपाराणी पाटील, अर्चना बोरगावे, समिता कवठेकर या महिलांनी रस्त्यावर उतरून स्वयंप्रेरणेने खड्डा बुजविला. यातून तरी बोध घेत महापालिका प्रशासनाने या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे बुजावावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: In Kupwad, Ranaraginis dug a pit on MIDC road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.