कुपवाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वारणालीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:17+5:302021-05-07T04:28:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शहरातील वाघमोडेनगर येथे कुपवाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा खरेदी करण्याचा भाजपच्या काळात केलेला महासभेचा ठराव ...

Kupwad Multispeciality Hospital in Varanasi | कुपवाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वारणालीतच

कुपवाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वारणालीतच

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शहरातील वाघमोडेनगर येथे कुपवाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा खरेदी करण्याचा भाजपच्या काळात केलेला महासभेचा ठराव अखेर शासनाकडून रद्द करण्यात आला. त्यामुळे हे हॉस्पिटल आता वारणालीतच उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने या कामाची निविदा काढली होती. आता पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता असताना शासनाकडून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत दहा आरोग्य केंद्रे आणि कुपवाडसाठी हॉस्पिटल मंजूर केले होते. त्यातील दहा आरोग्य केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र जागेच्या वादात अडकल्याने वारणालीत मंजूर केलेले ५० बेड्‌सचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले होते. यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर आहे. महापालिकेत अडीच वर्षापूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपच्या कुपवाडमधील नगरसेवकांनी हे हॉस्पिटल वारणालीत न करता वाघमोडेनगर येथे खासगी जागा विकत घेऊन तेथे उभारावे, अशी मागणी केली होती. वाघमोडेनगर येथे हॉस्पिटल झाल्यास कुपवाडच्या गावठाण व विस्तारित भागाला फायदा होणार असल्याचे भाजपचे म्हणणे होते. त्यानुसार वाघमोडेनगर येथे खासगी जागा विकत घेऊन हॉस्पिटल उभारणीचा ठराव महासभेत केला होता. या ठरावाला राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांच्यासह अन्य काहींनी जोरदार विरोध केला होता. वारणालीत महापालिकेची स्वत:ची जागा असताना वाघमोडेनगरला जागा खरेदीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मात्र तरीही तत्कालीन सत्ताधारी भाजपने बहुमताने ठराव मंजूर केला होता.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माने यांनी वारणालीतच हॉस्पिटल होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी वाघमोडेनगरमधील जागेचा ठराव विखंडित करण्यासाठी प्रस्ताव पाठविला. नगरविकास मंत्रालयाने जागा बदलाचा ठराव निलंबित केला. यानंतर आयुक्त कापडणीस यांनी आराखडा तयार करून चार कोटी ४५ लाख ६१ हजार ५२३ रुपये खर्चाची ऑनलाईन निविदा जाहीर केली होती. मात्र भाजप नगरसेवक गजानन मगदूम यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. महासभेचा वाघमोडेनगर येथील जागेचा ठराव विखंडित केलेला नसताना, अन्य जागेवर हॉस्पिटल उभारता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. यावर न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती.

ठराव विखंडित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आढावा बैठकीसाठी महापालिकेत आले होते. त्यावेळी ठराव विखंडित करण्याबाबत कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. शिंदे यांनी ठराव विखंडित करीत असल्याचे स्पष्ट केले होते. आता शासनाने तसा आदेश जारी केला. त्यामुळे वाघमोडेनगर येथील जागेचा विषय आता संपला असून, हे हॉस्पिटल वारणाली येथील जागेवरच उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Kupwad Multispeciality Hospital in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.