कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकाची २०.८४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:23+5:302021-05-07T04:28:23+5:30
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एस.आर. डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीतील एका कामगाराने बँकेत भरणा करण्यासाठी दिलेल्या रकमेच्या स्लिपवर खाडाखोड करून ...

कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकाची २०.८४ लाखांची फसवणूक
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एस.आर. डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीतील एका कामगाराने बँकेत भरणा करण्यासाठी दिलेल्या रकमेच्या स्लिपवर खाडाखोड करून २० लाख ८४ हजार ९१५ रुपयांच्या रकमेवर डल्ला मारून फसवणूक केली. कंपनीमालकाने कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एमआयडीसी पोलिसांकडून काही तासांतच कामगाराला अटक केली.
अटक केलेल्या संशयिताचे निखिल मोहन कदम (वय २४, रा. बामणोली ता. मिरज) असे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उद्योजक सिद्धार्थ बाफना यांच्या एस.आर. डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीत संशयित निखिल कदम हा कॅशिअर म्हणून गेल्या दोन वर्षांपासून काम करीत होता. या कालावधीत कदम याने मालकाचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे मालक बाफना यांनी त्यांच्याकडे बँकेत पैसे जमा करण्याची जबाबदारी दिली होती. कदम हा २० मे २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत बँकेत पैसे जमा करीत होता. कंपनीचे बँक खाते व बँकेत भरलेल्या बँक स्लिपमधील व्यवहारात अफरातफर आढळून आल्याचे मालकाला दिसून आले.
मालक बाफना यांनी बँकेच्या स्लिपची तपासणी केली असता त्या स्लिपवर खाडाखोड व बँक अधिकाऱ्यांच्या सहीवर व्हाइटनरने खाडाखोड केल्याचे आढळून आले. संशयित कदम यांनी बँकेत भरणा करण्यासाठी दिलेल्या रकमेतून वेळोवेळी २० ते ४० हजार रुपये बँकेच्या खात्यावर कमी भरल्याचे आढळून आले. त्यानंतर कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून २० लाख ८४ हजार ९१५ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मालक बाफना यांनी कुपवाड पोलिसात दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने संशयिताचा शोध घेऊन अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे.