कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगाराचा रिक्षाचालकांवर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST2021-07-28T04:28:11+5:302021-07-28T04:28:11+5:30

कुपवाड : शहरातील अनिल रामा पाटील (रा. कापसे प्लाॅट, कुपवाड) या रिक्षाचालकावर सराईत गुन्हेगार सूरज काळे याने तलवार ...

In Kupwad, a criminal attacked a rickshaw puller with a sword | कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगाराचा रिक्षाचालकांवर तलवार हल्ला

कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगाराचा रिक्षाचालकांवर तलवार हल्ला

कुपवाड : शहरातील अनिल रामा पाटील (रा. कापसे प्लाॅट, कुपवाड) या रिक्षाचालकावर सराईत गुन्हेगार सूरज काळे याने तलवार हल्ला करून त्याला जखमी केले. तसेच त्याचा भाऊ विनोद यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याबाबतची तक्रार रविवारी (दि. २५) रात्री उशिरा कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी संशयित सूरज काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी संध्याकाळी अनिल पाटील हा रिक्षा घेऊन कुपवाडमधून घरी जात होता. कुपवाड-बुधगाव रस्त्यालगत असलेल्या यल्लमा मंदिराजवळ रस्त्यावर हातात धारदार तलवार घेऊन उभे राहिलेल्या सराईत गुन्हेगार सूरज काळे याने रिक्षा थांबविली. अनिल पाटील याला तलवारीचा धाक दाखवून ‘तुझा भाऊ विनोद यास तातडीने बोलावून घे’ असा दम दिला. अनिल याने भीतीपोटी भाऊ विनोद यास मोबाईलवरून फोन करून बोलावून घेतले. विनोद येताच संशयित सूरज काळे याने विनोदला ‘तुला सोडणार नाही, तुला मस्ती आली आहे,’ मी आत्ताच हद्दपार भोगून आलो आहे, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी अनिल याने मध्यस्थी करून विनोद यास सोडविण्याचा प्रयत्न केला. अनिलने मध्यस्थी केल्याने संशयित सूरज याने अनिलवर तलवार हल्ला केला. या हल्ल्यात पाटील बंधू जखमी झाले. यावेळी नागरिक येत असल्याचे पाहून संशयित सूरज याने तलवार घेऊन पळ काढला. नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलविले. जखमी अनिल पाटील याने रविवारी रात्री उशिरा संशयित सूरज काळे याच्याविरोधात कुपवाड पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित सूरज काळे याच्या विरोधात कुपवाड पोलिसांत यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: In Kupwad, a criminal attacked a rickshaw puller with a sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.