कुपवाडला दोघा सावकारांना अटक
By Admin | Updated: November 28, 2014 23:46 IST2014-11-28T22:57:33+5:302014-11-28T23:46:08+5:30
पंधरा टक्क्याने वसुली : उद्योजकास मारहाण, जिवे मारण्याची धमकी

कुपवाडला दोघा सावकारांना अटक
कुपवाड : व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जापोटी दुप्पट रक्कम देऊनही आणखी रकमेसाठी तगादा लावत उद्योजकास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील खासगी सावकाराला साथीदारासह पोलिसांनी अटक केली. दरिकांत धोंडिराम रूपनर (वय २५, रा. कुपवाड) आणि त्याचा साथीदार बाळू संभाजी कोळेकर (२७, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) आरोपी आहेत.
उद्योजक संभाजी आकाराम पाटील (वय ४५, रा. कुपवाड) यांनी एप्रिल २०१३ मध्ये व्यवसायासाठी रूपनरकडून ९० हजार रुपये घेतले होते. या कर्जाच्या वसुलीपोटी दरमहा १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. आतापर्यंत पाटील यांनी रूपनरला सव्वादोन लाख रुपये दिले आहेत. ही वसुली दरमहा पंधरा टक्के व्याजाने करण्यात आली, तरीही रूपनरने पाटील यांना मुद्दल आणि दंड व्याजासह आणखी साडेतीन लाख रुपये येणेबाकी असल्याचे सांगून जादा रकमेचा तगादा लावला. ती रक्कम मिळत नसल्याचे दिसताच रूपनरने कोळेकर याच्या मदतीने काल, गुरुवारी (दि.२७) दुपारी एकच्या दरम्यान पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संभाजी पाटील यांनी रूपनर आणि कोळेकर यांच्याविरोधात ठाण्यात तक्रार दिली.